छत्रपती संभाजीनगर, 21 मार्च (हिं.स.)।
नाथषष्ठी निमित्त पैठण येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते सपत्निक विधीवत पूजा करण्यात आली. आ. विलास भुमरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसिलदार दत्ता भारस्कर आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी आलेल्या दिंड्यांमध्ये सहभागी होऊन वारकऱ्यांच्या भेटी घेऊन विचारपूस केली. नाथषष्ठी यात्रौत्सवासाठी यंदा एकुण ६२७ पायी दिंड्या पैठण व परिसरात दाखल झाल्या आहेत. सुमारे लाखभर वारकरी मुक्कामी आहेत. पैठण नगर परिषदेच्या वतीने या सर्व दिंड्यांच्या नोंदी करुन क्रमांकाचे बिल्ले दिले जातात. त्यांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून ३९ तर नाशिक येथून ४४ दिंड्या पायी दाखल झल्या आहेत. पुणे २०, वाशीम ३, अकोला ५, यवतमाळ २, जळगाव १०, हिंगोली ३, धुळे १, सोलापूर १०, नांदेड १, परभणी २४, जालना ८९, धाराशिव ६, अहिल्यानगर ११९, बीड ९० व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १२२ दिंड्यांचा समावेश आहे.
यात्रा मैदानासह वाळवंट व इतरत्र फिरती शौचालयांच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. पिण्याचे पाणी, आरोग्य तपासणी पथके, स्वच्छता पथके, वाहतुक नियंत्रक पथके आदी तैनात आहेत. तसेच पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.