ऑपरेशन ब्रह्मांतर्गत 15 टन मदत सामुग्री पाठवली
नवी दिल्ली, 29 मार्च (हिं.स.) : म्यानमारमध्ये शुक्रवारी 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर मोठा विध्वंस झाला. या नैसर्गिक आपत्तीनंतर भारत म्यानमारच्या मदतीला धावला आहे. भारताने शनिवारी ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत 15 टन मदत साहित्य म्यानमारला पाठवले. भारतीय हवाई दलाच्या ए सी-130जे या लष्करी वाहतूक विमानाने ही मदत यांगूनला रवाना करण्यात आली.
भारताने पाठवलेल्या मदत साहित्यात तंबू, स्लीपिंग बॅग, ब्लँकेट्स, अन्नपदार्थांची पाकिटे, पाणी शुद्धीकरण यंत्र, सौर दिवे, जनरेटर सेट्स आणि औषधांचा समावेश होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट करत सांगितले की, ऑपरेशन ब्रह्मा सुरू करण्यात आले आहे. भारताकडून मानवतावादी दृष्टीकोनातून मदतीची पहिली खेप म्यानमारमधील यांगून विमानतळावर पोहोचली आहे. म्यानमारच्या या शक्तिशाली भूकंपातील मृतांचा आकडा 1002 वर पोहोचला आहे. तर 2376 लोक जखमी झाले असून 30 जण बेपत्ता आहेत. यामुळे म्यानमार आणि थायलंडमधील मोठ्या प्रमाणात इमारती, पूल कोसळले असून पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.
म्यानमार, बँकॉकला शुक्रवारी भूकंपाचा तीव्र क्षमतेचा तडाखा बसल्याने दोन्ही देशांमध्ये हाहाकार उडाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये होता. त्याचे धक्के थायलंडमधील बँकॉकलाही बसले. या भूकपांची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल होती. म्यानमारसह थायलंड, चीन, बांगला देश आणि भारत या 5 देशांची भूमीही या भूकंपाने हादरली. दरम्यान, म्यानमारमध्ये शुक्रवारच्या शक्तिशाली भूकंपानंतर, आज, शनिवारी पुन्हा 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले.