मुंबई, ९ एप्रिल (हिं.स.) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सलग दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटची कपात केली आहे. या कपातीमुळे गृह आणि वाहन कर्जाचा ईएमआय कमी होणार आहे. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्वैमासिक चलन विषयक धोरणाची घोषणा करताना ही माहिती दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये एमपीसीने रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी करून 6.25 टक्के केला होता.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील आरबीआयच्या चलन.विषयक धोरण समितीने (एमपीसी) सोमवारी चलन विषयक धोरणाचा आढावा घेण्यासाठी तीन दिवसांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर रेपो रेट कमी करण्यात आला आहे.
गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, देशातील महागाई कमी झाली आहे जी चांगली गोष्ट आहे. सर्व एमपीसी सदस्यांनी मान्य केले की, महागाई लक्ष्यापेक्षा कमी आहे. भविष्यातील परिस्थिती दर कपात निश्चित करेल. गरज पडल्यास रेपो दर आणखी कमी केला जाईल.