अमरावती, 27 मार्च (हिं.स.)।रमजान ईद अगदी जवळ आली आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांमध्ये तयारीची लगबग सुरू झाली आहे. शहरातही ईदचा बाजार सजला आहे. शेवया, घिवर, फेण्या, खजूर आणि तत्सम साहित्याची दुकाने मुख्य बाजार परिसरात सजली आहेत. मुस्लीम बांधव सहकुटुंब बाजारात जाऊन विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. शहरातील इतवारा, श्याम चौक, नवसारी, ट्रान्सपोर्ट नगर, हबीब नगर, पठाण चौक, शालिमार आदी परिसरात मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जाते. आबाल वृद्धांपर्यंत सर्वजण नवीन कपडे परिधान करत असतात. शिरखुर्मा या गोड पदार्थावर रोजाची सांगता होते. त्यानिमित्ताने मुस्लिम बांधवांकडून नवीन कपडे, शिर खुर्मासाठी लागणारे पदार्थ तसेच अन्य विविध प्रकारच्या खरेदीसाठी बाजारपेठेत विशेषतः कपड्यांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, रमजान सुरू होताच बाजारपेठेत विविध खाद्यपदार्थ, साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंनी दुकाने फुलल्याचे दिसून येते. महिनाभरापासून शीतपेय, सरबत, मिठाई आणि फळांच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
रमजान ईदच्या निमित्ताने बाजार सजला असून, खरेदीही जोमात सुरु झाली आहे. त्यातही कपडे, पादत्राणे, इमिटेशन ज्वेलरी आदी वस्तूंची खरेदी केली जात आहे. यंदा बाजारात खरेदीची धूम असल्याचे व्यापारी सांगत आहेत. अवघ्या पाच दिवसांवर रमजान ईद आली आहे. मुस्लिम बांधवांमध्ये रमजान ईदची उत्सुकता वाढली आहे. यामुळे मुस्लिम भाविकांत ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठात महिला, युवतींची मोठी गर्दी दिसून येत आहे.पठाणी ड्रेसला सर्वाधिक पसंती रमजान ईदनिमित्त तयार आहे त्या कपड्यांपेक्षा यंदाही कुडता पायजमा यासह पारंपरिक पठाणी ड्रेस शिवून घेण्यास अधिक पसंती असल्याचे दिसत आहे. त्यासाठी कापड खरेदी करून आवर्जून ड्रेस शिवून घेतले जात आहेत. पारंपरिक कपड्यांबरोबरच फॉर्मल ड्रेसही शिवून घेण्याकडे कल आहे.