मुंबई, ११ एप्रिल (हिं.स.) : केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी १ लाख ७३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी मंजुरी दिली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात आज,शुक्रवारी एक महत्वाची बैठक पार पडली.या बैठकीनंतर महाराष्ट्रात रेल्वेच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी विविध प्रकल्पांची घोषणा करण्यात आली.
यावेळी गोंदिया-बल्लारशाह या नव्या रेल्वे मार्गांची घोषणा करण्यात आली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोंदिया ते बल्लारशहा २४० किलोमीटर दुहेरी रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी ४८९० कोटींचा निधी दिला जाणार आहे. या रेल्वे मार्गामुळे उत्तरेकडून दक्षिणेसाठी एक नवा मार्ग तयार झाला आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे,” असे अश्विनी वैष्णव म्हणाले. जळगाव-जालना या नव्या रेल्वे मार्गांची घोषणा रेल्वेमंत्र्यांकडून करण्यात आली. “महाराष्ट्रात रेल्वेची गुंतवणूक १ लाख ७३ हजार ८०४ कोटींएवढी झाली आहे.
यावर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी २३ हजार ७७८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. यूपीएचे सरकार असताना महाराष्ट्रासाठी केवळ ११७१ कोटी रुपयांचे रेल्वे बजेट मिळत होते,” असेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.तसेच मुंबईसाठी २३८ नव्या एसी लोकलचे काम सुरू करण्यात आल्याचेही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. तसेच कल्याण ते बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका, कल्याण-आसनगाव दरम्यान चौथ्या मार्गिकेचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यातील ऐतिहासिक किल्ले आणि अन्य सांस्कृतिक स्थळे नागरिकांना पाहता यावीत यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने एक खास योजना आखली आहे. राज्यात लवकरच एक सर्किट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यांसह रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी आणखी कोणते प्रकल्प मंजूर केले आहेत याची माहिती फडणवीस यांनीही दिली.