सोलापूर, 29 मार्च (हिं.स.) : सोलापूर शहरातून दररोज एक वाहन विशेषत: दुचाकी चोरीला जाते तर दरमहा शहरात ४९ चोऱ्या होतात, असे सव्वावर्षातील प्रमाण आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्युआर कोड पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. सध्या शहरातील ५५९ ठिकाणी पोलिस नियमित गस्त घालतातच, याशिवाय ज्या ठिकाणी पोलिसांची गस्त आवश्यक आहे,
त्याठिकाणच्या नागरिकांनी मागणी केल्यास तेथेही रात्रगस्त सुरू केली जाणार आहे. विविध गुन्ह्यातील फरार आरोपी, पोलिसांनी तडीपार केलेले आरोपी, सोलापूर शहरातील सर्व धार्मिक स्थळे, शाळा-महाविद्यालये, मोठमोठ्या बॅंका, व्यापारी पेठा, अशा ठिकाणी क्युआर कोड लावण्यात आले आहेत. दररोज २४ तासात तीनवेळा पोलिस त्याठिकाणी भेटी देतात आणि तो क्युआर कोड स्वत:च्या मोबाईलमध्ये स्कॅन करतात. पण, ज्याठिकाणी पोलिसांची गस्त नाही तेथेच चोरी, घरफोडीचे प्रमाण जास्त आढळते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता तेथील नागरिकांसाठी पर्याय उपलब्ध करून दिला आहे.