PM Narendra Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे दि. 19 जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर (PM Modi Mumbai Visit) येणार आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा मुंबईच्या (Mumbai News) दृष्टीने महत्वाचा असून दौऱ्यादरम्यान विविध विकास कामांचा शुभारंभ आणि प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. भविष्यात हे प्रकल्प मुंबईच्या प्रगतीत महत्वाचे ठरणार आहेत. जाणून घेऊया कोणते आहेत ते प्रकल्प आणि काय होणार त्याचा फायदा.
या प्रकल्पांचा होणार शुभारंभ
मुंबईतील मेट्रो 7 आणि मेट्रो 2A
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेट्रो लाईन 7 आणि 2 A चा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करतील. या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
400 किलोमीटर रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण
या प्रकल्पांतर्गत मुंबईतील 400 किमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होऊन खड्डे मुक्त रस्ते होणार आहे. आगामी दोन ते तीन वर्षात हे काम पुर्ण होणार असून यासाठी सहा हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे.
7 मलजल प्रक्रिया केंद्र
मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे आणि पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते मागील दहा ते पंधरा वर्षापासून रखडलेल्या मलजल प्रक्रिया केंद्र उभारणीचा भूमिपूजन होणार आहे. या अंतर्गत बृहमुंबई महापालिकेकडून वरळी, वांद्रे, मालाड, घाटकोपर, धारावी, भांडुप आणि वेसावे अशा 7 ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. हे 7 मलजल प्रक्रिया केंद्र पुर्णत्वास आल्यानंतर एकूण 2,464 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेने मलजलावर प्रक्रिया होऊन त्याचा पुनर्वापर शक्य होणार आहे.
रुग्णलयांचे भूमिपूजन आणि लोकार्पण
दैऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत वीस दवाखान्यांचा लोकार्पण केलं जाणार आहे. सध्या 66 ठिकाणी आपला दवाखाना हे रुग्णालय कार्यरत आहे. यात मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांसह विविध वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे. भांडूप मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, गोरेगाव सिद्धार्थ रुग्णालय आणि ओशिवरा प्रसूतिगृहचे भूमिपूजन आणि लोकार्पण होईल.
यासह प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत मुंबईतील १ लाख फेरीवाल्यांना मोदींच्या हस्ते थेट लाभ वितरण असे विविध प्रकल्प आणि योजनांचे भुमिपूजन, लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा मुंबईचा कायापालट करणारा ठरणार आहे.