नवी दिल्ली, 06 मार्च (हिं.स.) : जम्मू-काश्मीरचा पाकिस्तानने बळकावलेला भूभाग पाकव्यात काश्मीर (पीओके) परत घेण्यासाठी आम्ही प्रतीक्षा करतोय. पीओके भारतात विलिन होताच जम्मू-काश्मीरमध्ये पूर्ण शांतता प्रस्थापित होईल असे वक्तव्य परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. जयशंकर सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये “जगात भारताचा उदय आणि भूमिका” या विषयावर परराष्ट्रमंत्री बोलत होते.
एस. जयशंकर यांनी काश्मीर आणि केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल भाष्य केले. त्यात कलम 370 हटवणे, आर्थिक उपाययोजना आणि मतदानात लोकांचा सहभाग वाढवणे आदी मुद्यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत डॉलरच्या वापराबद्दल ब्रिक्स देशांच्या मतांवरही त्यांनी यावेळी चर्चा केली. जम्मू-काश्मीर संदर्भात जयशंकर म्हणाले की, काश्मीरमधील बहुतांश समस्या सोडवण्याचे चांगले काम आम्ही केले आहे. मला वाटते की कलम 370 हटवणे हे एक पहिले पाऊल होते. त्यानंतर, काश्मीरमध्ये विकास, आर्थिक उलाढाल आणि सामाजिक न्याय पुर्नस्थापित करणे हे दुसरे पाऊल होते. निवडणुकांमधील मतदानात लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढवणे हे तिसरे पाऊल होते. आता आम्ही पाकिस्तानने बळकावलेला जम्मू-काश्मीरचा भाग परत मिळण्याची वाट पाहत आहोत. पाकव्याप्त काश्मीर परत मिळवल्यानंतर काश्मीरचा मुद्दा सुटेल असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला.
जयशंकर पुढे म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेतील प्रशासन बहुध्रुवीयतेकडे वाटचाल करत आहे. जे भारताच्या हिताशी सुसंगत असे आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापार कराराच्या आवश्यकतेवर सहमती दर्शविली आहे.
आयात शुल्काबाबत (टॅरिफ) जयशंकर म्हणाले की, गेल्या महिन्यात व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली होती. यानंतर आता वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये आहेत. आम्ही शुल्काबाबत (टॅरिफ) खुली चर्चा केली. त्या चर्चेनंतर द्विपक्षीय व्यापार कराराच्या आवश्यकतेवर सहमतील झाल्याचे जयशंकर यांनी सांगितले.