अमरावती, 8 मार्च, (हिं.स.) परतवाडा येथील एका केंद्रातून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी कांद्याचे बी विकत घेऊन पेरणी केली होती. परंतु त्याला गोल आकार न आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. लांबलचक तयार झालेला कांदा व्यापारी खरेदी करण्यास नकार देत असल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शेतकरी रवींद्र चौरे, प्रफुल्ल दखणे व रवींद्र डांगरे यांनी रब्बी हंगामात पांढऱ्या कांद्याची पेरणी करण्याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परतवाडा केंद्रातून सप्टेंबर २०२४ च्या दरम्यान बियाणे विकत घेतले होते. ऑक्टोबर महिन्यात शेतावर ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली होती. सदर बियाणे उगवून झाल्यानंतर योग्यप्रकारे जोपासना केली, पण बियाणे उगवल्यावर पिकाची वाढ झाली नाही. त्यामुळे कांदा हा आकार घेत नसून गांजराप्रमाणे उंच होत असल्याचे लक्षात आले.
निर्धारित रकमेवर करार करून लागवडीच्या शेतात कांदा पेरणी करण्यासाठी पंधराशे रुपये प्रति किलोप्रमाणे बियाणे विकत घेणे, शेत तयार करणे, ट्रॅक्टस्द्वारे पेरणी करणेखत देणे, तणनाशक व इतर आवश्यक फवारणी करणे, पाणी देणे यासर्व बाबींवर शेतकऱ्यांना सुरवातीपासून शेवटपर्यंत साठ हजार रुपयांचा प्रति एकरच्या जवळपास खर्च आला आहे.
चार महिन्यांच्या परिश्रमानंतर कांदा काढणी केली असता तो खालच्या बाजूला कमी गोलाकार असून त्याची दांडी जाडी तयार झाली आहे. त्यामुळे शंभर क्विंटल प्रती एकराच्या उत्पादनावर पाणी फिरल्या गेले, सदरचे उत्पादन केवळ वीस क्विंटलच्या जवळपास येऊन ठेपले आहे. तेही निघालेला कांदा व्यापारी घेण्यास तयार नाहीत.
पश्नोट, कोपरा, भिलोना व जवळापूर येथील असंख्य शेतकऱ्यांना या बियाण्यांचा फटका बसला असून याबाबत ची तक्रार उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कडे केली आहे.आता या बाबत कृषी विभाग काय दखल घेते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.