लासलगाव, 26 मार्च (हिं.स.)।
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवार 28 मार्च ते मंगळवार 01 एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद राहणार आहे. मात्र या काळात भाजीपाला व द्राक्षेमणी या नाशवंत शेतमालाचे लिलाव नियमित सुरु राहतील अशी माहिती बाजार समिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
लासलगाव व्यापारी असोसिएशनने लासलगाव बाजार समिती प्रशासनास दिलेल्या पत्रानुसार शुक्रवार दिनांक 28.03.2025 रोजी व्यापारी वर्ग बाहेरगावी जाणार असल्याने तसेच शनिवार दिनांक 29.03.2025 रोजी शनि अमावस्या,रविवार दिनांक 30.03.2025 रोजी साप्ताहिक सुट्टी,सोमवार दिनांक 31.03.2025 रोजी रमजान ईद तसेच मंगळवार दिनांक 01.04.2025 रोजी बँक व्यवहार बंद असल्यामुळे असे एकूण पाच दिवस लासलगाव बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद राहणार असुन,यादरम्यान शेतकऱ्यांनी कांदा व भुसार माल बाजार समितीत विक्री साठी आणु नये असे आव्हान बाजार समिती कडुन करण्यात आले आहे.दिनांक २ एप्रिल २०२५ पासुन बाजार समितीतील कांदा व भुसार मालचे लिलाव पुर्ववत होतील याची सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी.
सध्या शेतकरी कांदा काढणी करत असून तो लगेच बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.लासलगाव सह जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे परंतु आता सलग पाच दिवस बाजार समितीत कांद्याचे लिलाव होणार नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण होणार आहे.