कोलकाता, 11 मार्च (हिं.स.) : पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील जाधवपूर विद्यापीठात देशविरोधी आणि आक्षेपार्ह भित्तिचित्रे आढळून आली आहेत. यामागे डाव्या विद्यार्थी संघटनांचा हात असण्याची शक्यता टीएमसीच्या विद्यार्थी नेत्यांनी व्यक्त केलीय.
जाधवपूर विद्यापीठात भिंतीवर आझाद काश्मीर आणि फ्री-पॅलेस्टाईनचे भित्तिचित्र तयार करण्यात आले आहे. विद्यापीठात सोमवारी 10 मार्च रोजी परीक्षा सुरू असताना ही भित्तिचित्रे तयार करण्यात आली होती. याबाबत माहिती मिळताच पोलिस साध्या वेशात कॅम्पसमध्ये पोहोचले.
जादवपूर विद्यापीठात गेल्या काही दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत, याठिकाणी 1 मार्च रोजी राज्याचे शिक्षण मंत्री ब्रात्य बसू यांची कार आणि ते जात असलेल्या अन्य एका वाहनाची त्यांच्या वाहनाला धडक झाल्याने दोन विद्यार्थी जखमी झाले होते. तेव्हापासून विद्यापीठात हिंसक निदर्शने सुरू आहेत. याप्रकरणी बसू आणि ओम प्रकाश मिश्रा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. परंतु, विद्यापीठाच्या गेट क्रमांक 3 जवळील भिंतीवर सोमवारी ‘आझाद काश्मीर’ आणि ‘फ्री पॅलेस्टाईन’ लिहिलेले दिसले, परंतु यामागे कोण किंवा कोणती संघटना आहे हे कळू शकले नाही. दरम्यान तृणमूल विद्यार्थी संघटनांनी आपली भूमिका भाजप विरोधी असून देशविरोधी नसल्याचे सांगितले. तसेच त्यांनी या कृत्यामागे डाव्या संघटनांचा हात असल्याचा संशय व्यक्त केलाय.