नाशिक, 29 मार्च (हिं.स.)।
– मोदी मैदान नव्हे, साधुग्राम(कुंभमेळा) मैदान म्हणा अशा आशयाचे निवेदनराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना देण्यात आले.
प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या नाशिक शहराला ऐतिहासिक धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभलेला आहे. अनेक संत, महात्मा तसेच अनेक महापुरुष देखील वास्तव्यास राहून गेले आहे. महत्वाचे म्हणजे अनेक तीर्थक्षेत्रांपैकी एक नाशिक शहराला अधिकचं महत्व प्राप्त झाले आहे. दर १२ वर्षांनी पवित्र कुंभमेळा आपल्या नाशिक शहरात भरत असतो, यानिमित्ताने पंचवटीतील तपोवन येथील मोकळ्या मैदानावर अनेक साधू, महंत, मोठमोठे आखाड्यांचे संत महंत येथे वास्तव्यास असतात.
पुरातन काळापासून हि परंपरा चालू आहे. त्यामुळे संबंधित मैदानाची खरी ओळख हि साधू महंतांच्या नावानुसार व्हावी. हि अनेक नागरिकांची अपेक्षा होती. तसेच इतर वेळेस याठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या सभा देखील आयोजित होत असतात, त्यामुळे संबंधित मैदानाला कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीचे नाव न देता. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने तपोवन येथील मोकळ्या मैदानाला ‘साधुग्राम (कुंभमेळा) मैदान’ म्हणून कायमस्वरूपी नामकरण करावे. तसेच या नावाचा मोठा फलक देखील लावण्यात यावा. जेणेकरून सर्व पर्यटक व यात्रेकरूंना समजेल की ठिकाणापासून कुंभमेळ्याला दरवर्षी सुरुवात होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खात्री यांना निवेदन देण्यात आले. तसेच लवकरात लवकर निवेदनाची दखल घेऊन तपोवन येथील मोकळ्या मैदानाला ‘साधुग्राम (कुंभमेळा) मैदान’ म्हणून घोषित करून मोठा नामफलक लावण्यात यावा. अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला. याप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हा कार्याध्यक्ष किरण पानकर, वाहतूक तालुकाध्यक्ष विलास धात्रक, उत्तर महाराष्ट्र ओबीसी उपाध्यक्ष चेतन जगताप, पंचवटी ओबीसी अध्यक्ष ललित ठेंगे, उपाध्यक्ष सुनील ओसवाल, लेवेश ठेंगे, दीपक कुलकर्णी, निखिल गायकवाड, रोहन जगताप, शुभम सांगळे, राहुल काळे, किशोर फसाळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.