नाशिक, 8 एप्रिल (हिं.स.)
नाशिकमधील सुमारे २५९ वर्षाची परंपरा असलेला पारंपरिक रामरथ यात्रेने मंगळवार ८ रोजी नाशिककरांच्या डोळ्यांची पारणे फिटले. सियावर रामचंद्र की जय… पवनसुत हनुमान की जय, जय सीता… राम सीता असा जयघोष करीत शेकडो वर्षांची परंपरा असलेली श्रीराम व गरुडरच मिरवणूक रात्री उशिरापर्यंत रंगली. यामुळे शहरात उत्सवाचे वातावरण होते. श्रीरामनवमी आणि त्यानंतर एकादशीस येणारा नाशिकचा ग्रामोत्सव चैत्र कामदा एकादशीस येणारा श्रीराम आणि गरुड रथोत्सव नाशिककरांसाठी मोठ्या श्रद्धेचा भाग आहे. मंगळवार दि.८ रोजी दुपारनंतर रथोत्सवाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली. यंदाचे उत्सवाचे मानकरी असलेल्या हेमंतबुवा पुजारी यांना पांढरा फेटा बांधण्यात आला. परंपरेनुसार असणारे मानकरी रवींद्र दीक्षित, नंदन दीक्षित यांना परंपरेनुसार असणारे मानकरी निमंत्रण देण्यात आले.
प्रारंभी श्री काळाराम संस्थानचे यंदाचे उत्सव मानकरी हेमंतबुवा पुजारी संस्थानचे विश्वस्त मंदार जानोरकर , धनंजय पुजारी, मंगेश पुजारी ,नरेश पुजारी , शांताराम अवसरे , शुभम मंत्री , डॉ. एकनाथ कुलकर्णी ,अजय निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम पंचायतनाची महापूजा करण्यात आली.पूजा झाल्यानंतर नारळ फोडून त्यानंतर आरती करून दास हनुमान मूर्ती मंदिराबाहेर काढण्यात आली, श्रीराम मूर्ती, चांदीच्या पादुका हातात घेऊन हेमंतबुवा यांनी मंदिराला एक प्रदक्षिणा घालून मूर्ती चांदीच्या पालखीत ठेवली. त्यानंतर कहार मंडळींनी परंपरेनुसार पालखी पूर्व दरवाजाने गरुड रथापर्यंत आणली .
त्याठिकाणी पालखी येताच उपस्थित भाविकांनी श्रीरामाचा जयघोष केला. त्यानंतर महाआरती करून भोगमुर्ती श्रीराम रथामध्ये ठेवण्यात आल्या . यावेळी रामरथ आणि गरूड रथ दोन्ही रथ समातंर उभे केले . आरतीनंतर गरुड रथ तर रामरथ पुढे निघाला. रथाच्या पुढे सनई चौघडा ढोल ताशांचे पथक होते . तर मस्तकावर छत्री धारण केलेले यंदाचे मानकरी परंपरेनुसार रथाकडे तोड करून उलट्या दिशेने मार्गक्रमण करत पुढे निघाले होते.यावेळी प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने अवघी पंचवटी रामनामात न्हाऊन निघाली होती.
यावेळी माजी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांसह नाशिककर भाविकांनी रथाचे दर्शन घेण्यासाठी आणि रथ ओढण्यासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रथासमोर भगवे ध्वज, पताकांसह सनई चौघडा, झांज, ढोल ताशे वाजवून वातावरण भक्तिमय केले जात होते. तसेच ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून रथांचे स्वागत करण्यात येत होते. संपूर्ण रथ मार्गावर रांगोळ्या, ठिकठिकाणी भव्य कमानी उभारून परिसर मंगलमय करण्यात आत्ता होता. रथमार्गावरील अनेक मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. संपूर्ण पंचवटी परिसर रामभक्तीने ओसंडून वाहत होता.
कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी रथावरून नागरिकांना सूचनादेखील करण्यात येत होत्या. रथाच्या मार्गावर अनेक मंडळांनी स्वागत करण्यासाठी स्टेज उभारले होते. श्रीराम रथ जसजसा पुढे सरकत होता तसतशी गर्दी देखील वाढत होती. रथाचे ठिकठिकाणी पूजन आणि आरती करण्यात येत होती. तसेच फुलांची उधळण केली जात होतो. गरुड रथाचे रोकडोबा तालीम येथे आगमन झाल्यावर आरती करण्यात आली. त्यानंतर गरुडरथ शहराच्या दिशेने मार्गस्थ झाला तर श्रीरामरथ नदी पार करीत नसल्याने तो गौरी पटांगणात उभा राहिला. शहराची प्रदक्षिणा करून गरुडरथाचे गौरी पटांगणात आगमन झाले असता या ठिकाणी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली.
दोन्ही रथांचे आगमन रामकुंड येथे झाल्यावर उत्सवमूर्तीची अमृत पूजा, पंचामृत अभ्यंगस्नान, अवभृत स्नान आणि महापूजा करण्यात आली. रथोत्सवासाठी काळाराम संस्थान, सरदार रास्ते आखाडा तालीम संघ, श्री अहिल्याराम व्यायामशाळा, रोकडोबा तालीम संघ, गुलालवाडी व्यायामशाळा, ओकाची तालीम संघ, मोहन मास्तर तालीम संघ, यशवंत व्यायामशाळाचे मलपटू आदी ठिकाणचे पहिलवान, पदाधिकारी, विश्वस्त आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घेताने. श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी वृद्ध यात्रेचा आनंद लुटण्यासाठी शहर परिसरातून लहान मुलांसह भाविकांनी विशेषतः महिला भाविकांनी गर्दी केली होती. दुपारपासूनच पंचवटीतील रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. कापड बाजारात गरुडरथाचे आगमन होताच भांडी विक्रेत्यांनी घंटानाद केला.
चोख बंदोबस्त
मिरवणूक मार्गावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः जाऊन पाहणी केली. तर, उपायुक्त किरणकुमार चव्हाण सहायक पद्मजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड , वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक यांच्यासह ६ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, १० सहायक पोलीस निरीक्षक, १५० पोलीस कर्मचारी ,३५ महिला पोलीस कर्मचारी, ६० होमगार्ड ,राखीव दलाच्या दोन तुकड्या असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.