नाशिक, 13 मार्च (हिं.स.)।
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे याचा शोध नाशिक पोलीस दुसऱ्या दिवशीही घेत असून अद्याप पर्यंत त्याच्या शोध लागलेला नाही. मात्र, पोलिसांनी नागरिकांनी बघितलेली ती व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचा दावा देखील केला आहे. याबाबत बोलताना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीने आंधळे याला बघितल्याचा दावा केला आहे त्याच्या माहितीमध्येच विसंगती असल्याने निश्चित तो आंधळेच आहे असे सांगता येत नाही.
बीड मधील मत्स्यजोग येथील सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील गेल्या 90 दिवसापासून फरार असलेल्या कृष्णा आंधळेला नाशिक शहरातील गंगापूर – मखमलाबाद लिंक रोड वरील दत्त मंदिराजवळ बघितल्याचा दावा येथील स्थानिक नागरिकांनी केला होता. त्यानुसार नाशिक पोलिसांनी शोध घेतला. या परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यानंतर त्याचा शोध लागला नाही म्हणून पुन्हा गुरुवारी पोलिसांनी या परिसरात फिरवून काही माहिती मिळते का याचा तपास केला. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजची पुन्हा तपासणी केली. या सर्व प्रकरणाची माहिती सातत्याने घेण्यात येत असून वेगवेगळ्या ठिकाणी तपास करण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशीही शहरातील इतर भागातही तपास सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, याबाबत बोलताना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीने आंधळे यांना बघितल्याचा दावा केला आहे. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर वेगवेगळी माहिती त्याच्या बोलण्यातून आली आहे. त्यामुळे त्यांनी बघितलेली व्यक्ती ही आंधळेच आहे असे ठामपणे सांगता येत नाही. तरीपण पोलिसांनी आपले शोध कार्य सुरू ठेवले आहे. वेगवेगळ्या स्तरावर ती माहिती देखील घेतली जात आहे.