नाशिक, 25 मार्च (हिं.स.)। लहान मुलांवर आई-वडील संस्कार करतात , त्या मुलांना पालकांचे प्रेम मिळते. मात्र, समाजात आई-वडिलांपासून वंचित असलेल्या मुलांसाठी आम्ही प्रशासकीय अधिकारीच आई-वडील म्हणून जबाबदारी पार पाडत आहोत. मला स्वतःला अनाथ, वंचित मुलांसाठी कार्य करायला आवडते. बालगृह आणि मुला-मुलींचे निरीक्षण गृहातील मुलांसाठी मी आठवड्यातून एक दिवस वेळ देते. सर्वांनी मिळून एकत्रपणे सामाजिक व कोणतेही काम केल्यास स्वप्नपूर्ती शक्य होते , असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
त्र्यंबकरोडवरील बालगृह आणि मुला-मुलींचे निरीक्षण गृह येथे गुंज फाउंडेशनच्या वतीने अभ्यासिका कक्ष आणि वाचनालय उभारण्यात आले असून या दोन्ही कक्षांचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रतिमा गेडाम यांच्या हस्ते आज झाले या प्रसंगी याप्रसंगी मित्तल बोलत होत्या.
याप्रसंगी मित्तल पुढे म्हणाल्या की , बालगृह , मुला-मुलींचे निरीक्षण या ठिकाणी मुली -मुलींवर चांगले संस्कार होत असून त्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. या मुलांसाठी मी दर आठवड्याला वेळ देते . माझे कुटुंब देखील माझ्या अशा उपक्रमामध्ये सहभागी होते. सध्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जि. प. शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. त्यात प्रामुख्याने स्पेलिंग बी या उपक्रमाच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. या ठिकाणी देखील स्पेलिंग बी उपक्रम राबविण्यात येत आहे . मुलांनी इंग्रजीला घाबरून न जाता इंग्रजी शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे आणि भविष्यात आपले करिअर घडवावे, असेही मित्तल यांनी सांगितले.
डॉ. प्रतिमा गेडाम यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे मानद सचिव चंदुलाल शहा यांच्या कार्याचा तसेच गुंज फाउंडेशनच्या उपक्रमाचा गौरव केला. तसेच या वंचित मुलांना आई-वडील नसले तरी त्यांचे अनेक पालक येथे उपस्थित आहेत. या मुलांनी मित्तल मॅडम यांचा आदर्श घेऊन जीवनात वाटचाल करावी , पुस्तकांना आपले मित्र बनवावे. खूप मेहनत करावी, आजच्या काळात सर्वच क्षेत्रात संधी आहे. नृत्य ,कला , क्रीडा अशा आपापल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवावे ,असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना निरीक्षणगृहाचे मानद सचिव चंदुलाल शाह यांनी सांगितले की , या संस्थेच्या गेल्या ४८ वर्षांपासून मी मानद सचिव म्हणून काम पाहत असून ही संस्था म्हणजे केवळ होस्टेल नव्हे तर अनाथ किंवा पालक नसलेल्या मुला मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो. अनेक सामाजिक संस्था संघटना तसेच व्यक्तींकडून या संस्थेला वेळोवेळी मदत मिळते. एका संस्थेकडून संगणक देण्यात आले त्याचप्रमाणे गुंज फाउंडेशनच्या वतीने एक अभ्यासिका कक्ष आणि एक वाचनालय कक्ष उभारणीसाठी ५० हजार रुपयांचा निधी देण्यात आला असून त्याचे उद्घाटन होत आहे.