अहिल्यानगर दि. 9 मार्च (हिं.स.)- चंदनापुरी येथील मेंढपाळ व्यवसाय करणारे चंदू दुधवडे यांच्यावर गुरुवारी बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी त्यांच्या पत्नी नंदाताई यांनी बिबट्याचे शेपूट ओढून त्याला त्रस्त केले. अर्धा तास झालेल्या या झुंजी नंतर बिबट्याने तेथून पळ काढला. आपल्या नवऱ्याचे बिबट्याशी लढून प्राण वाचवणाऱ्या नंदा दुधवडे यांचा डॉ. जयश्री थोरात व दुर्गा तांबे यांनी गौरव केला आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशन च्या वतीने महिला क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धा सुरू आहेत. या कार्यक्रमात आज हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत धाडस दाखवून आपल्या पतीचे प्राण वाचवणाऱ्या चंदनापुरीची वाघीण म्हणून नंदाताई दुधवडे यांचा गौरव करण्यात आला.याबाबत अधिक माहिती अशी की मेंढपाळ व्यवसाय करणारे चंदू दुधवडे व नंदा यांनी दिवसभर कार वस्ती जवळ आपली मेंढरं चारली. त्यानंतर तेथेच सायंकाळी मेंढरांची जाळी (वाघूर) टाकून तेथे मुक्काम केला.यावेळी रात्री बिबट्याने त्या वाघुर मध्ये उडी मारली आणि मेंढ्यांवर हल्ला केला.यामध्ये एक मेंढीचा मृत्यू झाला.मेंढीला सोडवण्यासाठी चंदू दुधावडे यांनी बिबट्याला हुसकण्याचा प्रयत्न केला.यावर बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.बिबट्याने चंदू यांची मान पकडली. बिबट्याने नवऱ्याला पकडलेले पाहून नंदा हिने बिबट्याचे मागून शेपूट ओढले. तरी बिबट्या आणि चंदू यांची झटापट सुरू होती. यानंतर नंदा यांनी प्रसंगावधान राखून लाकडाने बिबट्यावर हल्ला केला.यानंतर बिबट्या पळून गेला. प्रत्यक्ष मृतुच्या दाढेतून आपल्या पतीला वाचवणाऱ्या नंदा चे एकविरा फाउंडेशनच्या वतीने कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात व दुर्गा तांबे यांनी कौतुक केले.