अहिल्यानगर 9 एप्रिल (हिं.स.) :- परमेश्वराच्या नाम चिंतनाचा मार्ग स्वीकारल्यानंतर नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात प्रवेश करू शकत नाही.जे आपल्याला अपेक्षित आहे ते घडून आणण्याची ताकद नाम चिंतनामध्ये आहे. त्यामुळे शाश्वत सुख अध्यात्मिकतेमध्येच मिळत असते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जग इतक्या जवळ आले आहे की ते आपल्या खिशात आहे, विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी मनुष्य दुःखीच आहे मात्र आध्यात्मिक तेचा मार्ग स्वीकारल्यास तो आनंदी जीवन जगू शकतो. संतांचे विचार आचार अंगीकारल्यास आपले जीवन सार्थ झाल्याशिवाय राहणार नाही.अध्यात्मिकतेने नेहमीच समाजाला संस्कार दिले आहे त्यामुळे आपल्या जीवनाचा उद्धार झाला आहे जगामध्ये वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान सर्वश्रेष्ठ आहे असे मौलिक विचार हभप प्रांजलताई जाधव यांनी मांडले.
नालेगाव गाडगीळ पटांगण येथे श्री छत्रपती शिवराय तरुण मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ झाला.यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल सुनीता मुदगल आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नालेगाव गाडगीळ पटांगण येथे गेल्या 33 वर्षापासून हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.आजच्या युवा पिढीला संत महंतांच्या विचारांची खरी गरज आहे.त्यामुळे किर्तन सेवेच्या माध्यमातून समाजापर्यंत अध्यात्मिकतेचे धडे देण्याचे काम केले जाते धार्मिक कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असून आपल्या विचारांची देवाणघेवाण करत असतात.त्यामुळे एकमेकांमध्ये ऋणानुबंध निर्माण होत असतो असे मत दत्तात्रय मुदगल यांनी व्यक्त केले.