मुंबई, 8 मार्च (हिं.स.)। नदी प्रदूषण हा विषय गंभीर असून राज्यातून वाहणाऱ्या नद्या या प्रदूषण मुक्त असल्या पाहिजेत. जे उद्योग घटक नदी प्रदूषण करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये असणाऱ्या नद्या आणि त्यांचे प्रदूषित झालेले पाणी या प्रश्नांसंदर्भात सदस्य बापूसाहेब पठारे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, नद्यांच्या प्रदूषणाचा विषय अत्यंत गंभीर असून यासाठी एकत्रित आराखडा तयार करण्याची गरज आहे. यासाठी पर्यावरण विभाग, नगरविकास विभाग आणि जलसंपदा विभाग यांचा टास्क फोर्स गठीत करण्याची गरज असल्याचे मत मंत्री श्रीमती मुंडे यांनी व्यक्त केले.
मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, प्रदूषण नियंत्रणासाठी नवीन तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. यासाठी पर्यावरण विभागामार्फत नुकतेच आयआयटी मध्ये एक कार्यक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य जयंत पाटील व भीमराव तापकीर यांनी सहभाग घेतला.