धावत्या रेल्वेत मिळणार आता एटीएम सुविधा
मुंबई, 16 एप्रिल (हिं.स.) : मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस ही भारतातील पहिली एटीएम ट्रेन बनली आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी ऑनबोर्ड एटीएमची सुविधा देण्यात आली आहे. या अनोख्या उपक्रमामुळे आता प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास करतानाही रोख रक्कम काढू शकतील तसेच चेकबुक मागवणे आणि बँक खात्याचे विवरण अशा एटीएम मशिनद्वारे मिळणाऱ्या बँकिंग सेवा देखील मिळणार आहेत.
भारतीय रेल्वे आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही सेवा सुरू करण्यात आली असून, यामागील उद्दिष्ट प्रवाशांना अधिक सुविधा देणे आणि रेल्वेच्या बिगर-तिकीट उत्पन्नात वाढ करणे हे आहे. ही सुविधा पंचवटी एक्सप्रेससोबतच मुंबई-हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेसमधील प्रवाशांनाही उपलब्ध होणार आहे. ही आगळीवेगळी सुविधा भारतीय रेल्वेच्या Innovative and Non-Fare Revenue Ideas Scheme (INFRIS) या योजने अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. हे एटीएम या गाडीच्या वातानुकुलित डब्यात बसवण्यात आले असून त्याची यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे.आता प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास करत असतानाही रोख रक्कम काढू शकतात. ही सुविधा भारतीय रेल्वेच्या भुसावळ विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यातील सहकार्यामुळे शक्य झाली आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, चाचणी दरम्यान मशिनने संपूर्ण प्रवासात सुरळीत काम केले. मात्र इगतपुरी ते कसारा या मार्गावर काही ठिकाणी नेटवर्कची अडचण भासली. कारण तिथे बोगदे आणि मर्यादित मोबाईल सिग्नलमुळे नेटवर्क कमजोर असते.
भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) इति पांडे यांनी सांगितले की, ऑनबोर्ड एटीएम चाचणीचे निकाल समाधानकारक होते. आता प्रवासी प्रवासादरम्यान नागरिकांना रोख पैसे काढता येतील. मशिनच्या कार्यक्षमतेवर सतत लक्ष ठेवले जाईल. ही संकल्पना INFRIS बैठकीत सर्वप्रथम मांडण्यात आली होती आणि त्यानंतर लगेचच कार्यवाही सुरू झाली.जरी एटीएम वातानुकुलित डब्यात असले तरी पंचवटी एक्सप्रेसच्या सर्व 22 डब्यांना एकमेकांशी जोडणाऱ्या व्हेस्टिब्युल्समुळे सर्व प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.फक्त पैसे काढणेच नव्हे, तर प्रवासी चेकबुक मागवणे, खाते विवरण घेणे यासाठीही एटीएमचा वापर करू शकतात.
विशेष म्हणजे हेच एटीएम मुंबई-हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेसमध्येही वापरता येणार आहे, कारण दोन्ही गाड्या समान रेक (rake) शेअर करतात. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांनाही ही सेवा मिळू शकते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, या एटईएममध्ये शटर सिस्टम बसवले आहे आणि 24 बाय 7 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख केली जाते. ही सेवा प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरल्यास इतर गाड्यांमध्येही अशा प्रकारची सुविधा सुरू करण्याचा विचार केला जाईल, असेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.