जैन श्री संघ मुक्ताईनगर तर्फे भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा व विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक जयंतीचे औचित्य साधून सकल जैन श्री संघ, मुक्ताईनगर यांच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये शांततेचा आणि अहिंसेचा संदेश देणारी भव्य शोभायात्रा, स्पर्धा, पारितोषिक वितरण आणि सामूहिक प्रार्थनेचा समावेश होता.
या दिवशी सकाळी जैन स्थानकापासून प्रवर्तन चौकापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत जैन धर्मातील विविध सांस्कृतिक tableau, ढोल-ताशा पथक, वेशभूषा परिधान केलेली बालकं, आणि धर्मप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. ‘अहिंसा परमो धर्मः’ या महान संदेशाचा जागर करत शोभायात्रा बस स्टँड मार्गे प्रवर्तन चौक येथे पोहोचली. या ठिकाणी शांततेचे आणि सद्भावनेचे प्रतीक म्हणून सर्वांनी एकत्र येऊन प्रार्थना केली.
शोभायात्रेनंतर जैन स्थानक येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या मुलामुलींना आणि विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी सामूहिक प्रार्थना करत भगवान महावीरांचा स्मरण केला.
या विशेष प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या कु. संजनाताई पाटील आणि सुपुत्र हर्षराज चंद्रकांत पाटील यांनी देखील दर्शनासाठी जैन स्थानकास भेट दिली. त्यांनी भगवान महावीरांचे दर्शन घेऊन संघातील सदस्यांशी संवाद साधला.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडला. यामध्ये सकल जैन श्री संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिलावर्ग, युवक मंडळ आणि नगरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.