२७ मे पर्यंत अतिक्रमण हटवा, अन्यथा कारवाई अटळ! – मुक्ताईनगर नगरपंचायतीचा इशारा
महामार्गावर अतिक्रमणाचा विळखा, अपघातांचा ससेमिरा – वारकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचेच हाल
मुक्ताईनगर –
शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या इंदोर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील संत मुक्ताई चौक ते बुऱ्हानपूर रोडवरील स्मशानभूमी दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमणाचा भस्मासुर पसरला असून, यामुळे नागरिकांची व भाविकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे आता नगरपंचायतीने २७ मेपर्यंत अतिक्रमण हटवण्याचे तोंडी अल्टीमेटम दिले आहे.
प्रवर्तन चौक बनले अतिक्रमणाचे केंद्रबिंदू!
प्रवर्तन चौकात फळ विक्रेते, हातगाडीवाले व टपरीधारक यांचा प्रचंड जमाव असून, चौकाच्या सर्व बाजूंना हातगाड्यांनी ठाण मांडले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एका कुटुंबाने १५ गाड्या भाड्याने देऊन पूर्ण चौक व्यापल्याचे समोर आले आहे. यामुळे रहदारीत अडथळे निर्माण होत असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
संत मुक्ताईंच्या तीर्थक्षेत्राचा अपमान?
मुक्ताईनगर हे संत मुक्ताईंचे पवित्र तीर्थक्षेत्र. दर पंधरवड्याला एकादशीच्या दिवशी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नुकत्याच झालेल्या अंतर्धान सोहळ्यात ५ लाखांहून अधिक भाविक उपस्थित होते. मात्र अतिक्रमणामुळे वारकऱ्यांना चालण्यासाठी रस्ताच नव्हता – त्यामुळे किरकोळ अपघात घडल्याच्या तक्रारी आहेत.तर प्रवर्तन चौकातील मुजोर हातगाडी वाले एखाद्या वाहनाचा धक्का लागल्यावर वारकऱ्यांशी अनधिकृत जमाव करून वाद देखील घटल्याचा घटना घडल्या असल्याचे कळते. त्यामुळे शांत आणि संयमी असलेल्या शहराला या अतिक्रमणामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाने वेळीच या प्रकारावर बंधन आणणे गरजेचे आहे.
जिवीतहानीची गंभीर पातळी
गेल्या काही महिन्यांत महामार्गावरील अतिक्रमणामुळे अनेक अपघात झाले आहेत. प्रवर्तन चौकाजवळ एक निष्पाप बालक अपघातात मृत्यूमुखी पडले, तर नगरपंचायत कर्मचारीही याच महामार्गावर बळी गेला आहे. नुकतेच शिवसेना उपतालुकाप्रमुख व त्यांचा बालक एका अपघातातून थोडक्यात वाचले.
शहरवासीय संतप्त; शाळकरी मुलांपासून वृद्धांपर्यंत त्रस्त
दुचाकी चालवणं, पायी चालणं… हे सुद्धा मुक्ताईनगरमध्ये कठीण झालंय. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर अखेर नगरपंचायत प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांपर्यंत तक्रारी पोहोचल्या आहेत.
तीन नोटिसांनंतर तोंडी इशारा – आता नाही तर कारवाई!
याआधी तीन वेळा लेखी नोटीसा देऊनही अतिक्रमण हटवले गेले नाहीत. त्यामुळे आता मुख्याधिकारी सुभाष जानोरे यांच्या आदेशानुसार २७ मे, मंगळवार ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
“रस्ते मोकळे होणार का?” – नागरिकांचा सवाल
• शहरातील जनता, विद्यार्थी, भाविक – सर्वांच्या तोंडावर एकच प्रश्न – “हे रस्ते मोकळा श्वास घेणार का?” आता पाहावे लागेल की अतिक्रमणधारक यावर सकारात्मक प्रतिसाद देतात की प्रशासनाला कठोर कारवाई करावी लागते.
• की अतिक्रमण धारकांना पुन्हा राजाश्रय मिळेल आणि परिस्थिती जैसे थे राहील काय ?
• या अतिक्रमणाला नगरपंचायत , पोलिस प्रशासन की राजकीय मतांची पोळी नेमकं कोण आहे जबाबदार ?
• आतापर्यंत अनेक वेळा अतिक्रमण काढले गेले. लाखो रुपये तत्कालीन ग्रामपंचायत ते विद्यमान नगरपंचायत प्रशासनाने यावर खर्च केले आहे. आता पुन्हा अतिक्रमण काढण्यासाठी लाखो रुपये खर्च येणार आहे.
• त्यामुळे नगरपंचायत शहरात मुख्य वाहतूकीच्या रस्त्यावर अतिक्रमण होण्यास मज्जाव करेल का ?
• की डेली वसुली साठी पुन्हा अतिक्रमण जैसे थे होणार ?
•™नेमकं मुक्ताईनगर इंदौर ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग असलेल्या हायवे उड्डाणपूल संत मुक्ताई चौक ते बुऱ्हाणपूर रोडवरील स्मशान भूमी पर्यंत वारंवार होणारे बेशिस्त अतिक्रमण व पार्किंग थांबणार का ?
• संत भूमीत विनापरवानगी होणारी उघड्यावरील मांस विक्री वारंवार नोटीसा देऊनही नगरपंचायत प्रशासन बंद करणार का ?
– मुक्ताई वार्ता
(बातमी आवडली का? शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा!)