बांगलादेश स्थापना दिनानिमित्त पाठवले मोहम्मद युनूसला पत्र
नवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.) : बांगलादेशच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना शुभेच्छा पत्र पाठवले आहे. या पत्रात
बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी 1971 मध्ये झालेला मुक्ती-संग्राम हा भारत आणि बांगलादेशच्या संबंधांचा पाया असल्याचे सांगत मोदींनी बांगलादेशच्या स्थापनेत भारताच्या भूमिकेचे स्मरण करवले आहे.
या पत्रात मोदी म्हणाले की, ‘बांगलादेश राष्ट्रीय दिनानिमित्त मी तुम्हाला आणि बांगलादेशच्या जनतेला शुभेच्छा देतो.’ हा दिवस आपल्या सामायिक इतिहासाची आणि आपल्या द्विपक्षीय भागीदारीचा पाया रचलेल्या त्यागांची साक्ष देतो. बांगलादेशच्या मुक्ती संग्रामाची भावना आपल्या संबंधांना मार्गदर्शन करत आहे, जी अनेक क्षेत्रांमध्ये बहरली आहे आणि आपल्या लोकांना ठोस फायदे मिळवून दिली आहे. शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी आमच्या सामायिक आकांक्षा आणि एकमेकांच्या हितसंबंधांबद्दल आणि चिंतांबद्दल परस्पर संवेदनशीलतेच्या आधारावर आम्ही ही भागीदारी पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे मोदींनी म्हंटले आहे.
भारताच्या जुन्या मित्रपक्ष शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकार देशव्यापी आंदोलनानंतर पाडण्यात आल्यानंतर आणि माजी पंतप्रधानांना भारतात पळून जाण्यास भाग पाडण्यात आल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. सत्ता बदलानंतर स्थापन झालेल्या अंतरिम सरकारचे नेतृत्व अर्थशास्त्रज्ञ मुहम्मद युनूस यांच्याकडे आहे. अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या वृत्तांदरम्यान भारताने बांगलादेशशी आपली चिंता व्यक्त केली आहे. हे हल्ले जातीय नसून राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे ढाका सरकारने म्हटले आहे.
महम्मद युनूस यांना आगामी 3 व 4 एप्रिल रोजी बँकॉकमध्ये होणाऱ्या बिमस्टेक शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा करायची आहे. मात्र, भारताने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एवढेच नाही तर युनूस चीनला जाण्यापूर्वी भारतात येऊ इच्छित होते, परंतु त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही.