राज्यात तब्बल 33,700 कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ
नवी दिल्ली, 28 मार्च (हिं.स.) : एकीकडे छत्तीसगड नक्षली विळख्यातून मुक्त होत असतानाच रविवारी पंतप्रधान छत्तीसगडला विविध प्रकल्पांची भेट देणार आहेत. राज्याच्या बिलासपूर येथे पंतप्रधानांच्या हस्ते तब्बल 33,700 कोटींहून अधिक किंमतीच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. यामध्ये ऊर्जा, तेल आणि गॅस, रेल्वे, रस्ते, शिक्षण आणि गृहनिर्माण क्षेत्रांशी संबंधित प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे.
छत्तीसगड दौऱ्यात पंतप्रधान 9,790 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या बिलासपूर जिल्ह्यातील एनटीपीसीच्या सिपत सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट टप्पा-III (1 X 800 मेगावॅट) ची पायाभरणी करतील. हा पिट हेड प्रकल्प उच्च वीज निर्मिती कार्यक्षमतेसह अत्याधुनिक अल्ट्रा-सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित आहे. छत्तीसगड राज्य ऊर्जा निर्मिती कंपनी लिमिटेडच्या 15,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पहिल्या सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्टच्या (2 X660 मेगावॅट) कामाचा शुभारंभ ते करतील. ते पश्चिम क्षेत्र विस्तार योजनेअंतर्गत पॉवरग्रीडचे 560 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तीन वीज पारेषण प्रकल्पांचे राष्ट्रार्पण करतील.
भारताच्या शून्य उत्सर्जन उद्दिष्टांच्या अनुषंगाने तसेच वायू प्रदूषण कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जा उपाय प्रदान करणे यासाठी पंतप्रधान मोदी हे छत्तीसगडमधल्या कोरिया जिल्ह्यात तसेच सूरजपूर, बलरामपूर आणि सरगुजा जिल्ह्यांमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) सिटी गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी करतील. यामध्ये 200 किमी पेक्षा जास्त उच्च दाबाची पाइपलाइन आणि 800 किमी पेक्षा जास्त एमडीपीई (मध्यम घनता पॉलिथिलीन) पाइपलाइन आणि 1,258 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अनेक सीएनजी वितरण आउटलेट समाविष्ट आहेत. ते 2210 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या(एचपीसीएल) 540 किमी लांबीच्या विशाख-रायपूर पाईपलाईन प्रकल्पाची पायाभरणीदेखील करतील. या बहु-उत्पादन (पेट्रोल, डिझेल, केरोसीन) पाइपलाइनची क्षमता दरवर्षी 3 दशलक्ष मेट्रिक टनांपेक्षा जास्त असेल.
या प्रदेशातील दळणवळण सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून, पंतप्रधान एकूण 108 किमी लांबीच्या सात रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि 2,690 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे एकूण 111 किमी लांबीचे तीन रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. ते अभनपूर-रायपूर विभागात मंदिर हसौद मार्गे मेमू रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. ते छत्तीसगडमध्ये भारतीय रेल्वेच्या रेल्वे नेटवर्कचे 100% विद्युतीकरण देखील राष्ट्राला समर्पित करतील. या प्रकल्पांमुळे गर्दीचा ताण कमी होईल, दळणवळण सुधारेल आणि संपूर्ण प्रदेशात सामाजिक आणि आर्थिक विकास वाढेल.
या प्रदेशातील रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने, पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग-930 (37 किमी) च्या झलमला ते शेरपार विभागाचे आणि राष्ट्रीय महामार्ग-43 (75 किमी) च्या अंबिकापूर-पाठलगाव विभागाचे पेव्हड शोल्डरसह दुपदरीकरण करण्यात आलेल्या अद्ययावत मार्गाचे लोकार्पण करतील.
पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग-130 डी (47.5 किमी) च्या कोंडागाव-नारायणपूर विभागाच्या पेव्हड शोल्डरसह दुपदरीकरणासाठी पायाभरणी देखील करतील. 1,270 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या या प्रकल्पांमुळे आदिवासी आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये ये-जा करण्यात लक्षणीय सुधारणा होईल ज्यामुळे या प्रदेशाचा सर्वांगीण विकास होणे शक्य होईल.
सर्वांसाठी शिक्षण सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान राज्यातील 29 जिल्ह्यांमधील 130 पीएमश्री शाळा आणि रायपूर येथील विद्या समीक्षा केंद्र या दोन प्रमुख शैक्षणिक उपक्रमांचे लोकार्पण करतील. पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया योजनेअंतर्गत 130 शाळांचे अद्यायवतीकरण केले जाईल. या शाळा सुव्यवस्थित पायाभूत सुविधा, स्मार्ट बोर्ड, आधुनिक प्रयोगशाळा आणि ग्रंथालयांद्वारे उच्च दर्जाचे शिक्षण देण्यास मदत करतील. रायपूरमधील विद्या समीक्षा केंद्र शिक्षणाशी संबंधित सरकारी योजनांचे डेटा विश्लेषण आणि ऑनलाइन देखरेख करण्यात महत्वपूर्ण ठरेल. ग्रामीण भागातील कुटुंबांना सुयोग्य घरे उपलब्ध करून देण्याची आणि त्यांचे आरोग्य, सुरक्षा आणि एकूण जीवनमान सुधारण्याची वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी, प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीणअंतर्गत 3 लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेशचा कार्यक्रम आयोजित केला जाईल आणि पंतप्रधान या योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द करतील. –