पुणे, 6 मार्च (हिं.स.)।महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी (दि. ९ मार्च) सकाळी ९:३० वाजता, राज ठाकरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
नांदगावकर यांनी सांगितले की, ९ मार्च रोजी मनसेचा १९ वा वर्धापनदिन आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन साजरा करण्याची संधी पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच मिळत आहे. या मेळाव्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी व नवीन पदांची निर्मिती करण्यासाठी राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. अबू आझमी नेहमी चुकीची वक्तव्य करून लाईम लाईटमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. मीच मुसलमानांचा तारणहार आहे असे भासवण्यासाठी ते अशी वक्तव्य करतात. अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्याची सर्वपक्षीय मागणी योग्य आहे.
धनंजय मुंडे यांनी दिलेल्या राजीनाम्या विषयी नांदगावकर यांना प्रश्न विचारला असता नांदगावकर म्हणाले की, धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सरकारमध्ये उपइंजिन म्हणून आहेत. लालकृष्ण अडवाणी यांच्यावर आरोप झाले होते त्यावेळी त्यांनी तात्काळ राजीनामा दिला होता. हा भाजपचा इतिहास आहे. “हे राज्य अराजकतेकडे जात नाही ना ?” असे बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य आठवते, असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी भविष्यात कोणीही चुकीची वक्तव्य करू नये यासाठी राहुल सोलापूरकर आणि कोरटकर यांच्यावर गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांनी कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नांदगावकर यांनी केली.
चिंचवड येथे होणार्या ९ मार्चच्या मेळाव्याची पूर्ण तयारी झाली असून नव्या उमेदीने राज्यभर पक्ष बांधणीस पुन्हा सुरुवात करण्यात येणार असल्याचेही नांदगावकर यांनी यावेळी सांगितले.