अमरावती, 18 मार्च (हिं.स.) अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा आदिवासी बहुल भाग आहे. मेळघाटात आजही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे. आजही आजारी पडल्यास पोटावर गरम सळाखीने चटके देण्याची प्रथा आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी एका 22 दिवसीय बाळाला त्याच्या पोटावर तब्बल 65 चटके दिल्याची घटना पुढे आली होती. या चटके देण्याच्या डंबाप्रथेमुळे अनेक बालकांचा मृत्यू देखील झालेला आहे.
ही प्रथा बंद व्हावी मेळघाटातील स्त्री पुरुष मुलं व भूमका, मांत्रिक यांचं प्रबोधन व्हावं या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अमरावती जिल्ह्याचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मेळघाटात जनजागृती मोहीमला सुरुवात करण्यात आलेली आहे. यासाठी एक रथ तयार करण्यात आला असून यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव व त्यांचे सहकारी हे मेळघाटात गावागावात शाळांमध्ये, ग्रामपंचायत मध्ये गावकऱ्यांशी संवाद साधून ही प्रथा बंद करण्याविषयी जनजागृती करणार आहेत. या जनजागृती रथाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर,प्रा प्रवीण देशमुख व अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले आहे.