मुंबई, 13 एप्रिल (हिं.स.)।महिंद्रा समूहातील महिंद्रा एअरोस्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड (एमएएसपीएल) या कंपनीला एअरबस हेलिकॉप्टर्सतर्फे ‘एच-१३०’ या हलक्या, सिंगल-इंजिनच्या हेलिकॉप्टरमधील मुख्य फ्युसेलाजचे उत्पादन आणि असेंब्ली करण्याचे कंत्राट मिळाले आहे. या संदर्भात उभय कंपन्यांमध्ये नुकताच करार करण्यात आला. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या दृष्टीने हा करार एक मोठा टप्पा आहे. तसेच, जागतिक एरोस्पेस पुरवठा साखळीतील विश्वासार्ह भागीदार म्हणून महिंद्राचे स्थान या कंत्राटामुळे अधिक बळकट झाले आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू, नागरी विमान वाहतूक उड्डाण खात्याचे सचिव वुमलुनमांग वुअलनाम, एअरबस कंपनीचे भारत व दक्षिण आशिया विभागासाठीचे प्रमुख व व्यवस्थापकीय संचालक रेमी मायार्ड, तसेच महिंद्रा समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिश शाह यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
या कराराअंतर्गत महिंद्रा ‘एच-१३० हेलिकॉप्टरच्या’ मुख्य फ्युसेलाज असेंब्लीचे उत्पादन करेल. ही असेंब्ली त्यानंतर एअरबस हेलिकॉप्टर्सच्या युरोपमधील कारखान्यात पाठवली जाईल. या संदर्भातील उद्योगीकरणाची प्रक्रिया तात्काळ सुरू होणार असून पहिली कॅबिन असेंब्ली मार्च २०२७ पर्यंत वितरित केली जाण्याचे नियोजित आहे.
महिंद्रा समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिश शाह म्हणाले, “एअरोस्ट्रक्चर्सच्या या महत्त्वपूर्ण कराराच्या माध्यमातून ‘एअरबस’सोबतची आमची प्रदीर्घ भागीदारी आणखी दृढ करण्यात आम्हाला आनंद होत आहे. जागतिक नेत्याच्या भूमिकेत ‘एअरबस’ने भारताच्या एरोस्पेस पर्यावरणास सक्षम करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर त्याला स्थान मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ‘एअरबस’सोबतच्या आमच्या सिद्ध विश्वासार्हतेला पुढे नेण्याची, आमच्या औद्योगिक प्रक्रियेतील उत्कृष्टतेचा वापर करण्याची आणि या नव्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. हे सहकार्य भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला पाठिंबा देण्याच्या आमच्या कटिबद्धतेला अधोरेखित करते.”
एअरबस कंपनीचे भारत व दक्षिण आशिया क्षेत्रासाठीचे प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक रेमी मायार्ड म्हणाले, “आमच्याकडे भारतासाठी एक रणनीतिक योजना आहे आणि आम्ही ती अंमलात आणत आहोत. यामध्ये असेंब्ली, उत्पादन, अभियांत्रिकी, नवोपक्रम, डिजिटल आणि प्रशिक्षण अशा सर्व स्तरांवर संपूर्ण एरोस्पेस पर्यावरण विकसित करणे समाविष्ट आहे. एच-१३० फ्युसेलाजच्या उत्पादनाचा हा करार हा भारतीय पुरवठा साखळीतील वाढत्या औद्योगिक उत्कृष्टतेवरील ‘एअरबस’च्या विश्वासाचा दाखला आहे. भारतातील सक्षमता आणि स्पर्धात्मकतेच्या योग्य संतुलनामुळे हा उद्योग अधिकाधिक विकसित होत आहे. आमची भागीदार असलेल्या महिंद्रा एअरोस्ट्रक्चर्स कंपनीसोबतच्या या नवीन सहकार्याद्वारे भारताशी असलेले आमचे संबंध आणखी दृढ करण्यात आम्हाला आनंद होत आहे.”
महिंद्रा पूर्वीपासूनच ‘एअरबस’च्या व्यावसायिक विमान कार्यक्रमांसाठी विविध प्रकारचे भाग आणि उप-असेंब्ली पुरवीत आहे. हा नवीन करार ‘महिंद्रा’साठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण केवळ भाग आणि उप-असेंब्ली पुरवण्याच्या पुढे जाऊन मोठ्या आणि अधिक जटिल एअरोस्ट्रक्चर्सची निर्मिती करण्याचे हे काम आहे. यातून महिंद्रा आपले कौशल्य विस्तारीत आहे.
‘एअरबस’साठी भारत ही केवळ एक मोठी बाजारपेठ नसून एक महत्त्वाचे संसाधन केंद्रदेखील आहे. आज ‘एअरबस’च्या प्रत्येक व्यावसायिक विमानात भारतात बनवलेले घटक आणि तंत्रज्ञान समाविष्ट आहेत. सध्या एअरबस भारतातून वार्षिक १.४ अब्ज डॉलर किमतीचे घटक आणि सेवा खरेदी करते.
‘एच-१३०’ हे एक इंटरमिजिएट सिंगल-इंजिन हेलिकॉप्टर आहे. ते प्रवासी वाहतूक, पर्यटन, खासगी व व्यावसायिक विमानसेवा तसेच वैद्यकीय हवाई वाहतूक आणि गस्त मोहिमा यांसाठी तयार करण्यात आले आहे. पायलट आणि सात प्रवासी सहज बसू शकतील, एवढी मोठी प्रशस्त केबिन या हेलिकॉप्टरमध्ये आहे. मोठा गोलसर विंडस्क्रीन आणि रुंद खिडक्या यामुळे यातील प्रवाशांना उत्कृष्ट दृश्यमानता मिळते. अत्याधुनिक स्वरुपाचे तंत्रज्ञान, सामग्री, प्रणाली आणि एव्हियोनिक्स यांमुळे हे हेलिकॉप्टर शांत आणि शक्तिशाली बनले आहे.