भोपाळ , 27 एप्रिल (हिं.स.)।मध्यप्रदेशात एक भीषण अपघात घडला आहे. मध्यप्रदेशामधील ममंदसौर जिल्ह्यातील नारायणगड येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार विहिरीत कोसळून अपघात घडलं आहे. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी(दि.२७) दुपारी घडली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून मृतांची संख्या वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायणगड पोलीस स्टेशन परिसरातील बुढा-तकरवत क्रॉसिंगवर रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एका अनियंत्रित कारने पहिल्यांदा एका दुचाकीला धडक दिली आणि नंतर ती बाजूच्या विहिरीत पडली. या अपघातात आतापर्यंत एकूण सात जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दुचाकीस्वार गोबर सिंग याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दौरवाडी येथील मनोहर सिंग आणि एका ग्रामस्थाचा विषारी गॅसमुळे गुदमरून मृत्यू झाला. कारमध्ये १० हून अधिक लोक होते, जे उज्जैन जिल्ह्यातील उन्हेल येथून नीमच जिल्ह्यातील अंतरी माता मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात होते.
या अपघातात विहिरीतून एका महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि क्रेनच्या मदतीने इको व्हॅन बाहेर काढण्यात आली. बचाव कार्य सुरू आहे. अपघातात जखमी झालेल्या तीन वर्षांच्या मुलीसह चार जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले. त्यांना उपचारासाठी मंदसौर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री जगदीश देवदा, जिल्हाधिकारी अदिती गर्ग, एसपी अभिषेक आनंद, अतिरिक्त एसपी गौतम सोलंकी आणि एसडीओपी नरेंद्र सोलंकी घटनास्थळी पोहोचले.
उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांनी सांगितले की, चालकाचे व्हॅनवरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन रस्त्यावरून विहिरीत पडली. मृत्यूंची संख्या स्पष्ट नाही. व्हॅनमध्ये दोन मुले होती. चार जणांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विहिरीत विषारी वायू असल्याने बचाव कार्य वेगाने सुरू आहे,” असे ते म्हणाले.