अमरावती, 3 मार्च (हिं.स.)।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्याने भावी नगरसेवकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. महानगरपालिका, नगरपालिका,नगरपरिषद यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुका आता आणखी पुढे गेल्याने निवडणुकीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांची वाढली आहे.
एप्रिल ते मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता होती. मात्र, त्या लांबणीवर पडल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये निराशा पसरली आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी केलेला खर्च आणि प्रचार यावर इच्छुकांनी तात्पुरता ब्रेक लावल्याचे दिसत आहे. विविध भागांमध्ये जनसंपर्क वाढवणे, कार्यकर्त्याचे स्नेहभोजन, उत्सवांमध्ये सहभाग आणि प्रचारासाठी होणाऱ्या खर्चावर आता काही काळ खीळ बसली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी मात्र अजूनही वातावरण तापलेले आहे.
निवडणुकीची अनिश्चितता, भेटीगाठी थांबल्या!
कार्यकर्त्यांशी संपर्क साधणे, सभा घेणे आणि विविध ठिकाणी भेटीगाठी करून आपला जनाधार मजबूत करण्यासाठी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. मात्र, निवडणुकीच्या अनिश्चिततेमुळे हे सर्व थांबले आहे. निवडणुका कधी होणार याचा अद्याप तरी काही मुहूर्त दिसत नसल्याने उगाच खर्च करणे महागात पडत असल्याने इच्छुकही आता शांत बसत आहेत.
इच्छुकांच्या राजकीय हालचाली मंदावल्या!
निवडणुका केव्हा होतील आणि प्रचार पुन्हा कधी सुरू करायचा याबाबत सर्वच जण संभ्रमात आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय हालचाली मंदावल्या असून, इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.निवडणूक कार्यक्रमाकडे इच्छुकांचे लक्ष लागले असून, ते जाहीर झाल्यावरच वातावरण तापणार आहे.