अमरावती, 3 एप्रिल (हिं.स.)
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दर्द से हमदर्द तक ट्रस्ट आणि जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा सदन येथे ‘वकील आपल्या दारी’ या उपक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक, मुंबई उच्च न्यायालयाचे अॅड. प्रकाश साळसिंगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘दर्द से हमदर्द तक’ ट्रस्ट गेल्या ३ वर्षांपासून संपूर्ण राज्यभर गरजूंना मोफत कायदेशीर सल्ला देण्याचे काम करीत आहे. संस्थेचे कार्य मुंबई आणि पुणे शहरांमध्ये विशेष प्रभावी आहे.
राज्यात वकील आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना कायदेशीरसाहाय्य पुरवले जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते नुकतेच झाले. या उपक्रमांतर्गत, एक विशेष वाहन विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये फिरून लोकांना मोफत कायदेशीर सल्ला देणार आहे. ‘लिगल अॅड ऑन व्हील्स’ या उपक्रमाद्वारे वकील आणि स्वयंसेवक विविध ठिकाणी जाऊन लोकांना कायदेशीर साहाय्य आणि मार्गदर्शन करतील.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकरवे. यार्लगड्डा, कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव मंगला कांबळे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. विश्वास काळे, अॅड. प्रद्युम्न भिरंगी, न्यायरक्षक कार्यालयाचे प्रमुख अधिवक्ता अॅड. जितेंद्र देशमुख, दर्द से हमदर्द तक संस्थेचे विदर्भ प्रमुख अॅड. विभव दीक्षित, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अॅड. संकेत राव आदी यावेळी उपस्थित होते.दर्द से हमदर्द तक संस्थेचे विदर्भ प्रमुख अॅड. दीक्षित आणि अॅड. संकेत राव यांनी ‘लिगल अॅड ऑन व्हील्स’ उपक्रमाची आणि संस्थेची माहिती दिली. श्रीमती कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले.