लातूर , 6 एप्रिल (हिं.स.)।लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी (दि. ५) रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.यामध्ये बाबासाहेब मनोहरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या लातूरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना बार्शी रोडजवळील शासकीय निवासस्थानी घडली. त्यावेळी सुरक्षारक्षकासह परिवारातील सदस्यांनी मनोहरे यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब मनोहरे हे एमआयडीसी परिसरातील शासकीय अधिकाऱ्यांच्या वसाहतीतील बंगल्यात वास्तव्यास आहेत. त्यांनी शनिवारी(दि.५) रात्री नेहमीप्रमाणे जेवण केले आणि झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेले. मध्यरात्री सुमारे साडेअकराच्या त्यांच्या खोलीतून गोळीबाराचा मोठा आवाज आला. आवाज ऐकून सुरक्षा रक्षक आणि कुटूंबीयांनी तत्काळ खोलीकडे धाव घेतली. त्यावेळी मनोहरे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.त्यानंतर त्यांना तातडीने लातूरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीत गोळी डोक्याच्या उजव्या बाजूने आरपार गेली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मेंदूच्या काही भागांना इजा झाली असून कवटीच्या हाडांचे तुकडे मेंदूत पसरले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अत्यंत जटिल अशी शस्त्रक्रिया करावी लागत आहे.
शस्त्रक्रियेपूर्वीची वैद्यकीय स्थिती सांगताना, उपचार करणारे डॉ. हनुमंत किनीकर यांनी सांगितले की, “सध्या आयुक्त मनोहरे यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. शस्त्रक्रियेनंतर पुढील स्थिती स्पष्ट होईल.” दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरू आहे. आयुक्तांनी टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत प्रशासन आणि पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.