पाटणा, 02 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आज, बुधवारी एअर एम्बुलन्सने उपचारासाठी दिल्लीला नेण्यात आले.
लालूंच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांना जुन्या जखमांचा त्रास उमाळून आला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे आलीय. गेल्या काही वर्षांत लालू प्रसाद यादव यांच्यावर 3 मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यांच्यावर 13 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांच्या छातीत स्टेंट बसवण्यात आला आहे. यापूर्वी 2022 मध्ये त्यांचे सिंगापूरमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले होते. त्यांना मुलगी रोहिणी हिने किडनी दान केली होती.
तर 2014 मध्ये लालूंवर ओपन हार्ट सर्जरी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून लालू प्रसाद यादव अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतानाही दिसले. मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर, अनेक बाबतीत खबरदारी घ्यावी लागते. किडनीच्या आजाराव्यतिरिक्त, लालू इतर अनेक आजारांनी ग्रस्त आहेत.