Mangal Grah Mandir : व्यक्तीच्या जीवनात नवग्रहांचा प्रभाव असतो. त्यात मंगळ ग्रहाचा विशेष प्रभाव दिसून येतो. ग्रहांचा सेनापती म्हणून ओळख असलेला मंगळ ग्रह नावाप्रमाणेच मंगलकारी आहे. मात्र, मंगळ ग्रहाबाबत अनेक समज गैर समज आहेत. यात व्यक्तीचा मंगळ ग्रहाशी प्रामुख्याने संबंध येतो तो लग्न जुळवताना. पत्रिकेत मंगळ असला की त्यासाठी विविध पुजा केल्या जातात. यासाठी मंगळ ग्रह मंदिरावर जात पुजा केली जाते. देशात उज्जैन आणि अमळनेर अशा दोनच ठीकाणी मंगळ देवाचे मंदिर असून त्यातल्यात्यात अमळनेरच्या श्री मंगळदेव ग्रह मंदिराचे अध्यात्मिक महत्त्व आणि वैशिष्ट्ये काही वेगळेच आहे. चला तर मग जाणून घेऊया अमळनेर श्री मंगळदेव ग्रह मंदिराविषयी माहिती.
असा आहे मंदिराचा इतिहास
अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात आहे. अमळनेर तालुक्यातील मंगळग्रह सेवा संस्था संचलित हे मंदिर भारतातील अतिप्राचीन जागृत देवस्थान म्हणून मान्यता मिळालेले वैश्विक पातळीवरील देवस्थान आहे. श्री मंगळदेव ग्रह मंदिरात श्री मंगळदेव ग्रहाची स्वयंभू मूर्ती, श्री पंचमुखी हनुमान आणि श्री भूमी मातेची मूर्ती आहे. मंदिराला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. हरियाणा आखाड्याचे हटयोगी पंचतत्वात विलीन परमपुज्य श्री जगदीशनाथ महाराज यांनी एका पायावर येथे दिर्घकाळ तप केला होता त्यामुळे ही तप भूमी देखील आहे. मात्र, मंदिर कोणी बांधले, मूर्तीची स्थापना कोणी व केव्हा केली, यासंदर्भातील अधिकृत माहिती उपलब्ध नाही, अमळनेर शहरासह परिसरातील काही जाणकारांच्या मते १९४० नंतर मंदिर दुर्लक्षित व नंतर भग्न झाले. त्यानंतर श्री मंगळदेव ग्रह मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार सन १९३३ मध्ये झाला.
१९९९ नंतर मंदिराचा काया पालट
१९९९ नंतर झालेल्या जीर्णोद्धाराने मंदिर आणि परिसराचा आता पूर्णपणे नयनरम्य रित्या कायापालट झाला आहे. मागील काही वर्षात येथील विविध विकासकामांचा व सोयी-सुविधांचा वेग कमालीचा गतिमान झालेला आहे. मंदिराचा परिसर सुमारे १५ एकर आहे. श्री मंगळदेव ग्रहाची धार्मिक महतीमुळे भाविक, भक्त व पर्यटक लाखोंच्या संख्येने मंदिरात येत असतात. दर मंगळवारी सुमारे ८० हजार ते एक लाखापेक्षा अधिक भाविक तथा पर्यटक मंदिरात येतात. अन्य वारीही येणाऱ्यांची संख्या हजारांवर आहे.
मांगलीक दोष निवारणासाठी येतात भाविक
मंगळग्रह देवस्थानावर येणाऱ्यामध्ये विशेषत्वाने जे मांगलिक आहेत किंवा ज्या मुला-मुलींचा विविध कारणांमुळे विवाहयोग जुळून येत नाही असे विवाहेच्छु्क अधिक असतात. तसेच श्री मंगळग्रह देवता भूमिपुत्र असल्याने ज्यांचा संबंध शेती, माती आणि रेतीशीआहे असे व्यावसायिक म्हणजेच शेतकरी, सिव्हिल इंजिनिअर, आर्किटेक्ट, बिल्डर, डेव्हलपर व इस्टेट ब्रोकर ही मंडळी श्री मंगळग्रह देवतेला आराध्य दैवत मानतात. त्यामुळे ते मोठ्या संख्येने मंदिरात येतात. त्याचप्रमाणे श्री मंगळदेव ग्रह देवता ही युद्धदेवता असल्याने ज्यांचा संबंध सुरक्षेशी आहे ती मंडळी मंगळग्रहाला आराध्य दैवत मानतात. मंगळ देवता रोगमुक्ती, ऋणमुक्ती, भयमुक्तीची आणि समृद्धी प्रदान करणारे असल्याने भाविकांची मोठी श्रद्धा या ठिकाणी आहे.
मंगळग्रह सेवा संस्थेला प्राप्त विविध बहुमान
अमळनेर मंगळग्रह सेवा संस्थेला विविध बहुमान प्राप्त आहे. श्री मंगळग्रह मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या श्री मंगळग्रह सेवा संस्थेला चार आयएसओ मानांकन, शासनाचा पर्यटन मित्र पुरस्कार, पाणी फाउंडेशन पूरस्कार व टपाल खात्याचे विशेष पाकीट यासह अनेक पुरस्कार व बहुमान आजवर प्राप्त झाले आहेत. गेल्या दहा वर्षात इतके पुरस्कार व बह्मान मिळविणारे हे देशातील एकमेव मंदिर / संस्था म्हटल्यास त्यात काहीही वावगे ठरणार नाही.
असं पोहचता येत अमळनेर मंगळग्रह मंदिर
अमळनेर येथील अतिप्राचीन अशा या मंगळग्रह मंदिरावर पोहचण्यासाठी तुम्ही बाय रोड किंवा रेल्वेने सहज पोहचू शकता. या ठिकाणी पोहचण्यासाठी तुम्ही व्हाया धुळे किंवा व्हाया जळगाव पोहचू शकतात. जळगाव येथून साधारण ६५ किलोमीटर तर धुळ्याहून ३६ किलोमीटर आंतर आहे. जळगावहून रेल्वे, बस, खाजगी वाहने तर धूळ्याहून ही बस आणि खाजगी वाहनांचा पर्याय उपलब्ध आहे.