बंगळूरू, 11 एप्रिल (हिं.स.)।इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील २४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं घरच्या मैदानात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला ६ विकेट्स राखून पराभूत केले.यंदाच्या हंगामातील दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग चौथा विजय ठरला आहे. संघाला विजय मिळवून देण्यात केएल राहुलनं मोलाची कामगिरी बजावली. त्याने ५३ चेंडूत नाबाद ९३ धावांची खेळी केली. संघाला विजय मिळवून दिल्यावर लोकेश राहुलनं खास अंदाजात सेलिब्रेशन केले. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.
१६३ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ५८ धावांवर ४ विकेट्स गमावल्या होत्या. लोकेश राहुलनं ट्रिस्टन स्टब्सच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी १११ धावांची दमदार भागीदारी करत सामना दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूनं फिरवला. विजय षटकार मारल्यावर त्याने हे माझं घर आहे, माझे मैदान आहे असा इशारा करत विजयाचा आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. लोकेश राहुल हा आरसीबीकडून खेळलाय. एवढेच नाही तर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाकडून खेळतो. एम चिन्नास्वामी स्टेडियमशी केएल राहुलचं खास नाते आहे. तेच त्याने या सेलिब्रेशनमधून सांगण्याचा प्रयत्न केला.
धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ अडचणीत सापडला होता. RCB संघाला दिल्ली कॅपिटल्सला रोखून घरच्या मैदानात जिंकण्याची संधी होती. मात्र ही संधी आरसीबीला साधता आली नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या आघाडीच्या विकेट्स पडल्या त्यावेळी किंग कोहली आपल्या नेहमीच्या तोऱ्यात अगदी आक्रमक अंदाजात विकेटच सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाले. केएल राहुलसमोरही त्याने तोरा दाखवला. पण शेवटी लोकेश राहुल RCB च्या विजयाआड आला. त्याने एकहाती मॅच फिरवत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला.