कोलकाता , 19 मार्च (हिं.स.)।कोलकाता नाईट रायडर्सला यंदाच्या इंडियन प्रिमिअर लीगमधील लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धचा 6 एप्रिल रोजी होणारा ईडन गार्डन्सवरील सामना रिशेड्यूल केला जाईल अशी दाट शक्यता आहे.कोलकाता पोलिसांनी राम नवमीच्या पार्श्वभूमीवर 6 तारखेला आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या मिरवणुकींच्या पार्श्वभूमीवर अद्याप परवानगी दिलेली नसल्याचं सांगितलं जात आहे.
भाजपाचे पश्चिम बंगालमधील नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये रामनवमीनिमित्त 20 हजार मिरवणुका आयोजित केल्या जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. म्हणूनच बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहशीश गांगुली यांनी कोलकाता पोलिसांबरोबर मंगळवारी(दि. १८) दोन बैठका घेतल्या. या बैठकीनंतर पोलिसांनी अद्याप 6 तारखेच्या सामन्यासाठी परवानगी दिलेली नसल्याचं गांगुली यांनी स्पष्ट केलं. “आम्हाला या सामन्यासाठी पुरेशी सुरक्षा पुरवता येणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. पोलिसांचं संरक्षण नसेल तर 65 हजार प्रेक्षकांना हाताळणं कठीण होईल,” असं गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे.
“आम्ही बीसीसीआयला यासंदर्भात कळवलं आहे. याबद्दल अंतिम निर्णय घेण्यासाठी अजूनही कालावधी हाती आहे. मागील वर्षीही राम नवमीच्या दिवशी असलेल्या आयपीएलच्या सामन्यामध्ये फेरबदल करण्यात आलेला,” असंही गांगुली यांनी सांगितलं. कोलकात्यामध्ये केकेआर आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या संघांच्या सामन्याबद्दल विशेष उत्सुकता दिसून येत आहे. लखनऊचे मालक संजीव गोयंका कनेक्शनमुळे दोन्ही संघांना समान पाठिंबा असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र आता हा सामनाच दुसरीकडे हलवला जाण्याची शक्यता असल्याने चाहत्यांची हिरमोड होण्याची शक्यता आहे.