राज्यातील 10 ठिकाणी एकाच वेळी केली कारवाई
जम्मू,19 मार्च (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या भटिंडी येथील घुसखोरी प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मोठी कारवाई केली आहे. एनआयएने आज,बुधवारी सकाळी जम्मूमध्ये 10 ठिकाणी छापे टाकले. पाकिस्तानातून भारतात होणाऱ्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीसंदर्भात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरी प्रकरणी एनआयए छापे टाकत आहे. यापूर्वी 13 डिसेंबर 2024 रोजी एनआयएने राज्यात 19 ठिकाणी छापेमारी केली होती. या काळात जम्मू आणि काश्मीरमधील रियासी, बडगाम, अनंतनाग आणि बारामुल्ला जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले. तसेच 21 नोव्हेंबर 2024 रोजी एनआयएने जम्मूच्या अनेक भागात छापे टाकले होते. एनआयएच्या या छाप्याचा उद्देश पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या भारतात प्रवेश करण्याच्या प्रयत्नांबद्दल महत्त्वाची माहिती गोळा करणे हा होता. एनआयएने पोलिस आणि निमलष्करी दल सीआरपीएफच्या मदतीने अनेक ठिकाणी छापे टाकले होते.
गेल्या 5 ऑक्टोबर रोजी दहशतवादी कट रचणे आणि दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या संशयावरून 5 राज्यांमधील 22 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले होते. एनआयएने महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्ली येथे ही छापेमारी केली होती. ही कारवाई जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित बाबींसंदर्भात करण्यात आली. एनआयएने बारामुल्ला आणि जम्मू-काश्मीरमधील इतर भागातही छापे टाकले. एनआयएने सुरक्षा दलांच्या मदतीने बारामुल्ला येथील मौलवी इक्बाल भट यांच्या घराची झडती घेतली.
एनआयएच्या या कारवाईपूर्वी 1 ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले होते. त्यावेळी एनआयएच्या पथकाने दक्षिण चोवीस परगणा, आसनसोल, हावडा, नादिया आणि कोलकाता येथील 11 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या.