जळगाव, 6 मार्च (हिं.स.) : तालुक्यातील आसोदा शिवारात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर अचानक मधमाशांच्या थव्याने हल्ला केला. या हल्ल्यात पाच शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आसोदा शिवारातील शेतकरी आणि शेतमजूर शेतात आपल्या नेहमीच्या कामात व्यस्त असताना, एका झाडावर असलेल्या मोठ्या मधमाशीच्या पोळ्यावर अज्ञात कारणाने हालचाल झाली. त्यामुळे मधमाशांचा मोठा थवा अचानक आक्रमक झाला आणि जवळ काम करत असलेल्या शेतकऱ्यांवर तुटून पडला. शेतकऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली, मात्र संतप्त मधमाशांनी त्यांचा पाठलाग करत दंश केला. या हल्ल्यात पाच शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी शेतकऱ्यांची नावे: शोभा नारायण झोपे (वय ६५) ,भागवत ज्ञानदेव खाचणे (वय ५४),सारिका रुपेश भंगाळे (वय २७), रेखा प्रेमचंद अत्तरदे (वय ७०) रुपेश सुधाकर भंगाळे (वय २७)हे जखमी झाले. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांना शेतात काम करताना विशेष काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. मधमाशांच्या पोळ्यांपासून दूर राहावे आणि कोणतीही हालचाल करताना सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे