नागपूर, 21 मार्च (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी करणारा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी रईस अहमद शेखचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज, शुक्रवारी फेटाळून लावला.
रईस अहमद शेख असदुल्ला शेख हा जम्मू-काश्मीरच्या पोरा, पुलवामा येथील रहिवासी असून तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करतो. त्याला नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृति मंदिराची रेकी केल्या प्रकरणी 15 सप्टेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती. सध्या तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. रईस अहमद शेख असदुल्ला शेख याने कनिष्ठ न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु, तो फेटाळण्यात आल्यानंतर 11 मार्च रोजी त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामीनासाठी अर्ज केला. दहशतवाद्याचे वकील निहाल सिंह राठोड यांनी कोर्टाला सांगितले की, आरोपी रईस अहमद शेख याने नागपूरच्या महाल परिसरातील संघ मुख्यालयाचे सर्वेक्षण करण्याचा कट रचला होता. परंतु, तो तसे करू शकला नाही. कोणत्याही बेकायदेशीर कृत्यासाठी त्याने ही रेकी केली होती हे सिद्ध करणारे कुठलेही पुरावे नाहीत. त्यामुळे त्याचे कृत्य हे बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) कक्षेत येत नाहीत असा युक्तीवाद ऍड. निहाल सिंह राठोड यांनी केला.
त्यावर सरकारी वकील देवेंद्र चौहान यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपी शेख हा बंदी घातलेल्या दहशतवादी संघटने जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये जिवंत हातबॉम्ब बाळगल्याप्रकरणी खटला दाखल आहे. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने उपलब्ध पुराव्याच्या आधारावर रईसला जामीन नाकारला. राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्याला कारागृहात ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.