येवला, ३१ मार्च (हिं.स.) : विविधतेने नटलेल्या आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक हे गुण्या गोविंदाने राहतात. देशात राहणारा कुठलाही समाज हा आपापसात मतभेद ठेवण्याची शिकवण देत नाही. त्यामुळे कुठल्याही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही ही सर्वच समाज बांधवांची जबाबदारी असल्याचे सांगत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
रमजान ईद निमित्ताने येवला शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. या कार्यक्रमास उपस्थित राहून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, अपलसंख्यांक आयोगाचे सदस्य माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, अमजद पठाण, शफीक शेख, मलिक मेंबर, उपाध्यक्ष दत्ता निकम यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला विधानसभा मतदारसंघ सर्व समाज घटकांच्या विकासासाठी आपले प्रयत्न सुरू असून त्या दृष्टीने विविध विकासकामे करण्यात आली आहे आगामी काळातही विकासाची ही कामे अविरत सुरू राहतील. लवकरच ईदगाह मैदानावर देखील निवारा शेडसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले. तसेच रमजान ईद च्या निमित्ताने येवला शहरात ५ एप्रिल रोजी ईद च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी उपस्थित बांधवांना दिली.
ते म्हणाले की, मुस्लिम बांधवांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावे. व्यसनापासून दूर राहण्यासाठी धर्मगुरू यांच्याकडून जे आवाहन करण्यात येत आहे. त्या आवाहनाला समाज बांधवांनी प्रतिसाद देत व्यवसनापासून तरुणांना दूर ठेवावे असे आवाहन देखील त्यांनी केले.