गांजा बाळगल्याप्रकरणी एनडीपीसीएस अंतर्गत कारवाई
जयपूर, 03 मार्च (हिं.स.) : महाकुंभमेळा कालावधीत आयआयटी-बाबा नावाने प्रकाश झोतात आलेल्या अभय सिंग यांना गांजा बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आलीय. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.राजस्थान पोलिसांनी त्याला अटक करुन चौकशीनंतर त्याची जामिनावर सुटका केली आहे.
अभय सिंग हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईचा पदवीधर आहे. महाकुंभमेळ्यात तो “आयआयटी बाबा” म्हणून लोकप्रिय झाला. सत्याच्या शोधात आध्यात्माकडे ओढला गेल्याचा दावाही त्याने केला होता. रिद्धी सिद्धी परिसरातील एका हॉटेलमध्ये राहून गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत अभय सिंगला ताब्यात घेतले यावेळी त्याच्याकडून गांजा जप्त केला. त्याचे प्रमाण अल्प होते. चौकशीदरम्यान त्याने दावा केला की, “तो अघोरी असून प्रथेनुसार गांजाचे सेवन करतो.”
या प्रकरणी माहिती देताना शिप्रपथ पोलीस ठाण्याचे अधिकारी राजेंद्र गोदरा यांनी सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली की बाबा अभय सिंह उर्फ आयआयटी बाबा एका हॉटेलमध्ये राहत आहे. त्याने सोशल मीडियावर जीवन संपविणार असल्याची पोस्ट केली आहे. आम्ही तत्काळ घटनास्थळी पोहचलो. त्याची चौकशी केली असता. त्याने गांजा सेवनाची कबुली दिली. तसेच माझ्याकडे गांझा असल्योही सांगितले. ‘गांजा’ बाळगणे हा एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा आहे. म्हणून, आम्ही त्याला अटक केली. त्याची चौकशी केली. यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली आहे. त्याने सोशल मीडिया पेजवर केलेल्या पोस्ट संदर्भातही चौकशीसाठी त्याला पुन्हा बोलवले जाणार असल्याचे गोदरा यांनी सांगितले.————————-