बंगळुरू, 13 मार्च (हिं.स.) : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट (स्पाडेक्स) मोहिमेचा भाग असलेल्या 2 उपग्रहांचे अनडॉकिंग यशस्वीरित्या पूर्ण केले. अनडॉकिंग प्रक्रियेत अंतराळातील एसडीएक्स-01 आणि एसडीएक्स-02 उपग्रह यशस्वीरित्या वेगळे करण्यात आले. इस्रोचे हे यश भारताच्या अंतराळ संशोधन प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
इस्रोच्या स्पाडेक्स मोहिमेचा भाग असलेली अनडॉकिंग (डी-डॉकिंग) प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे आज, गुरुवारी केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. या यशाबद्दल विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान विभागाचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अभिनंदन केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांचेदेखील आभार मानले आहेत. स्पाडेक्स उपग्रहांनी डी-डॉकिंग पूर्ण केल्याबद्दल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्रोचे अभिनंदन केले. यासंदर्भातील ट्विटरवरच्या (एक्स) पोस्टमध्ये जितेंद्र सिंह म्हणाले की, हे प्रत्येक भारतीयासाठी आनंददायी आहे. स्पाडेक्स उपग्रहांनी अविश्वसनीय डी-डॉकिंग साध्य केले. यामुळे भारतीय अंतरिक्ष स्टेशन, चांद्रयान 4 आणि गगनयान यासारख्या महत्त्वाकांक्षी भविष्यातील मोहिमांच्या सुरळीत अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्यामुळे उत्साह वाढत असल्याचे सिंह यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये नमूद केले आहे.
गेल्या 30 डिसेंबर 2024 रोजी स्पाडेक्स मोहिम लाँच करण्यात आली होती. स्पाडेक्स मिशन, भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वाच्या असलेल्या भेटी, डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने इस्रोकडून ही मोहिम राबवण्यात आली होती. जानेवारीच्या सुरुवातीला डॉकिंग प्रक्रियेत अचूक युक्त्या समाविष्ट होत्या जिथे उपग्रह सुरक्षित डॉकिंगपूर्वी 15 मीटर अंतरावरून एकमेकांशी संपर्क साधत होते. या यशासह, भारताने अवकाश तंत्रज्ञानातील जागतिक स्थान मजबूत केले आहे. अवकाशातील डॉकिंग आणि अनडॉकिंग प्रक्रिया पूर्ण करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश ठरला आहे.