नवी दिल्ली, 14 मार्च (हिं.स.) : पाकिस्तानने भारतावर दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. भारताने हा आरोप फेटाळून लावत आज, शुक्रवारी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. दहशतवादाचा खरा केंद्रबिंदू कुठे आहे, हे जगाला ठाऊक असल्याचे सांगत भारताने पाकिस्तानला खडसावले आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल म्हणाले की, पाकिस्तानने केलेले बिनबुडाचे आरोप आम्ही जोरदारपणे फेटाळतो. जगातील दहशतवादाचा केंद्रबिंदू कुठे आहे? हे संपूर्ण जगाला माहिती आहे. पाकिस्तानने दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा तसेच स्वतःच्या अंतर्गत समस्या आणि अपयशांचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याऐवजी स्वतः आत डोकावून पाहावे असे जयस्वाल यांनी सुनावले. नैॠत्य पाकिस्तानमधील बलुच बंडखोरांनी मंगळवारी जाफर एक्सप्रेसवर हल्ला केला होता.
ही रेल्वेगाडी ताब्यात घेत त्यातील 214 जणांना सुमारे 24 तास ओलीस ठेवले होते. त्यानंतर पाकिस्तानकडून भारतावर दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात आला. पाकिस्तानने अनेकदा भारतावर बलुच फुटीरतावादी गटांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. पण यावेळी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी या हल्ल्यामागे अफगाणिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त केला. त्यांनी सांगितले की या प्रकरणी फोन कॉलद्वारे अफगाणिस्तानशी संपर्क साधल्याचे पुरावे आहेत असे खान यांनी म्हंटले होते.