IND vs NZ: ICC ने टीम इंडीयाला (Team India) मोठा झटका दिला आहे. 18 जानेवारी रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडयाचा (IND vs NZ) पहिला वनडे सामना खेळला गेला. यामध्ये स्लो ओव्हर रेटसाठी टीम इंडियाला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध स्लो ओव्हर रेटसाठी टीम इंडीयाला मॅच फीच्या तब्बल 60 टक्के दंड ठोठावण्यात आला. टीम इंडीयाने वेळेनुसार तीन षटके हळू टाकली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचे एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनलचे मॅच रेफरी जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) यांनी सांगितले.
काय आहे नियम
खेळाडू आणि खेळाडू सहाय्य कर्मचार्यांसाठी ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.22 नुसार, खेळाडूंना त्यांच्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड आकारला जातो. टीम इंडीयाने वेळेनुसार तीन षटके हळू टाकली. त्यानुसार, भारताचा कर्णधार रोहित शर्माने मैदानावरील पंच अनिल चौधरी आणि नितीन मेनन, तिसरे पंच केएन अनंतपद्मनाभन आणि चौथे पंच जयरामन मदनगोपाल यांनी ठेवलेला ठपका स्विकारला. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज भासत नसल्याचे लक्षात घेत हा दंड ठोठावण्यात आला.
मालिकेत टीम इंडीयाची आघाडी
दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड या एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शुभमन गिलचे या विजयात मोठे योगदान आहे. त्याने द्विशतक झळकावून भारताला ३४९ धावांपर्यंत नेले. गिलने 208 धावांची धडाकेबाज खेळी खेळली आणि दुहेरी शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज ठरला. लक्षाचा पाठलाग करताना न्युझीलंडचा संपूर्ण संघ 337 धावांवर बाद झाला.
उद्या रंगणार दुसरा सामना
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना उद्या 21 जानेवारी रोजी रायपूर येथे होणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याकडे टीम इंडीया लक्ष देईल, तर न्यूझीलंड संघ हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.