सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.)।
चैत्री यात्रा कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान केले आहे. तसेच, सोन्या, चांदीचे दागिने अर्पण केले आहेत. त्याचबरोबर मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्निवास, पूजा, फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून दोन कोटी 56 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील चैत्री यात्रेच्या तुलनेत एक कोटी 29 लाख 81 हजार 267 इतकी वाढ झाल्याची माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
मागील वर्षी 26 लाख 10 हजार 396 रुपये देणगी, लाडूप्रसाद विक्रीतून 19 लाख सहा हजार, भक्तनिवास सात लाख 52 हजार 298 रुपये, 21 हजार पुजेच्या माध्यमातून, 46 लाख 84 हजार 124 रुपये हुंडीपेटीतून, 89 हजार 259 रुपयाचे सोने-चांदीचे दागिणे अर्पण, तसेच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमुत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यमातून 26 लाख 10 हजार 711 रुपये प्राप्त झाले होते. तथापि मागील वर्षी श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने दि. 15 ते 21 एप्रिल 2024 या कालावधीत पहाटे 5 ते रा.11 पर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध करून दिले होते.