Crime News: मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवी येथे पत्नीस शारिरीक व मानसिक छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पती दिपक सुरेश भालशंकर यांस भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 05 मे 2018 रोजी आरोपी दीपक याने पत्नी लक्ष्मी हिला वेळोवेळी शारिरीक, मानसिक छळ व त्रास देवून तिला पुर्णा नदी पात्रात आत्महत्या करण्यास भाग पाडले. या प्रकरणी मयत विवाहीता लक्ष्मी हिची आई रेखा भगवान इंगळे यांच्या फिर्यादीवरुन मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला मयत विवाहीतेचा पती व सासरकडील इतर मंडळी अशा ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे प्रकरण न्यायालयात आले असता या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकुण 06 साक्षीदार तपासण्यात आले यात फिर्यादी रेखा भगवान इंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आकाश शिंगणे, तपास अधिकारी पीएसआय सचिन इंगळे यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. त्यानुसार भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जाधव यांनी आरोपी क्रमांक एक दिपक सुरेश भालकर यांस भादवि कलम 498-अ अंतर्गत गुन्हा शाबीत झाले वरुन 3 वर्ष सक्त मजुरी व 5000/- रुपये दंड तसेच भा.द.वि. कलम 306 शाबीत झाले वरुन 5 वर्षे सक्त मजुरी व 5000/- दंड अशी शिक्षा ठोठावली. तर इतर आरोपींची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली. याप्रकरणी पैरवी अधिकारी म्हणून सहाफौजदार शेख रफिक शेख कालु यांनी काम पाहिले.