पुणे, 15 मार्च (हिं.स.)।
येरवड्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांवर सव्वाकोटी रुपयांच्या अनियमिततेचा ठपका आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने ठेवला आहे. रुग्णालयाची देयके फुगविण्यासह सरकारी निधीच्या गैरवापराचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अधीक्षकांसह तत्कालीन सरकारी कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम वसूल करावी, अशी शिफारसही समितीने केली आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालयातील आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाने सहायक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने चौकशी करून आपला अहवाल आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडे सादर केला आहे. या अहवालात मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुनील पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. ‘डॉ. पाटील यांनी २०१७ पासून रुग्णालयात १ कोटी २५ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला असून, त्यांच्यासह तत्कालीन प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक आणि लिपिक (कारभारी विभाग) यांच्याकडून हे पैसे वसूल करावेत,’ असे समितीने म्हटले आहे.