नाशिक, 8 मार्च (हिं.स.)।
– संत जनार्दन स्वामी नगर येथे जागृती महिला प्रतिष्ठाण, अष्टविनायक मित्र मंडळ, त्रिमूर्ती नगर सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळ व मदत फाऊंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या भव्य कार्यक्रमाचे आयोजन अंबादास खैरे यांनी केले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत महिला उपस्थित होत्या.
आपल्या घराला घरपण देताना हा प्रपंचीक गाडा सांभाळताना महिला नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात. माहेर, सासर यातील त्या भक्कम दुवा असतात. त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही तरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनींसाठी व्हावेत म्हणून अंबादास खैरे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त या होम मिनिस्टर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गाणी, उखाणे, विविध खेळ, विविध खेळांमध्ये शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाची उडालेली धांदल अन् उत्साह स्पर्धेमध्ये रंगत वाढविणारा ठरला. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी कला शिक्षक व नाट्यकलावंत गणेश गायकवाड यांनी उपस्थित महिला भगिनीं बरोबर विविध गीते सादर करून, महिलासोबत नृत्य करून, कार्यक्रमात रंगत आणली होती. तसेच विनोदाने भरलेल्या या कार्यक्रमात प्रेक्षक हसून हसून लोटपोट झाले.
या कार्यक्रमामध्ये पहिले बक्षीस मानाची सोन्याची नथ वेदिका उमेश गवारे, दुसरे बक्षीस पैठणी साडी निशा पवार व लता जाधव, तिसरे बक्षीस चांदीचे जोडवे ललिता पवार, दिपाली कापडणीस व पल्लवी चोडिया, चौथे बक्षीस इमिटेशन पोत शैला पवार व पाचवे बक्षीस इमिटेशन नेकलेस प्रतिभा पाटील यासह इतर विजेत्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध आकर्षक बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला.