अमरावती, 1 एप्रिल (हिं.स.)। विविध मागण्यासाठी १७ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आरोग्यमित्राचे धरणे आंदोलन नुकतेच स्थगित करण्यात आले.आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आंदोलकांची संघटना सीटूचे डॉ. डी.एल. कराड यांच्या झालेल्या चर्चामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष अमरदीप तायडे यांनी सांगितले.
राज्याचे आरोग्य मंत्री आबिटकर यांनी आरोग्य मित्रांचे मानधन १३,९०० वरून १६ हजार रुपये करण्यास मान्यता दिली असून उर्वरित मागण्याबाबत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेण्याचे मान्य केले आहे. सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियनच्या नेतृत्वात महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने गेल्या सहा दिवसापूर्वी जिल्हा कचेरीवर धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामुळे आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे प्रस्ताव अडचणीत आले होते.त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक पाऊल उचलत संघटनेशी चर्चा केली. दरम्यान चर्चेनुसार अधिवेशनात निर्णय झाले नाहीत तर स्थगित केलेले आंदोलन पुन्हा एकदा सुरू केले जाईल, असे संघटनेचे म्हणणे आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना सोबत आयुष्मान भारतचे काम करत असतानाही या योजनेचा कोणताही मेहनताना आरोग्य मित्रांना देण्यात आला नाही. त्यांना बीएसआयसी लागू केली परंतु अद्याप कार्ड दिले नाहीत.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेपोटी मिळणारे मानधन तोकडे आहे, ते ३६ हजार रुपयापर्यंत वाढवून दरवर्षी त्यात दहा टक्के वाढ करावी.
पाच वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या आरोग्य मित्रांना उपदान देण्यात यावे, इत्यादी मागण्यासाठी हे आंदोलन पुकारले होते. सिटूचे पुढारी सुभाष पांडे, रमेश सोनुले, मुकुंद काळे यांच्यासह आरोग्य मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमरदीप तायडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.