इंदापूर , 4 मार्च पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या गंभीर घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. एसटी प्रशासनासह विविध राजकीय पक्ष संघटनाही आता खडबडून जाग्या झाल्या आहेत. अशा घटना कुठेही पुन्हा घडू नये .म्हणून सतर्क राहण्याच्या संदर्भात आज मंगळवारी (दि. ४) राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर बस स्थानकाला भेट देऊन प्रत्येक विभागाची अत्यंत बारकाईने चौकशी केली.
हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी(दि. ४) इंदापूर बस स्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना देतानाच एसटीतील प्रवासी महिला व इंदापूर बस स्थानकावरून ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, स्त्रियांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे. स्वारगेट बस स्थानकावर घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, या घटनेतील अटक केलेल्या आरोपीवर शासनाने कठोर कारवाई करावी,
अशी मागणीही त्यांनी केली.महिला, मुलींच्या सुरक्षेसाठी एस.टी. प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी सतत जागृत राहिले पाहिजे. प्रशासनाबरोबर समाजातील सर्वांची, महिला वर्गाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे. बस स्थानकावर पोलीस मदत केंद्र चोवीस तास सुरू राहणार आहे. पोलीस वर्दीचा वचक व दरारा कायम राहिला पाहिजे. तसेच महिला, मुलींनी त्रास होत असल्यास तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांशी, पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.
पुढे ते म्हणाले की , आपण राज्य मंत्रिमंडळ असताना ‘ बांधा वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर इंदापूरचे बस स्थानक बांधण्यात आले आहे. मध्यमवर्गीय जनतेला प्रवासासाठी एसटी ही एकमेव सुरक्षित साधन आहे. जनतेचे एसटीशी आपुलकीचे नाते निर्माण झालेले आहे. बस स्थानक व परिसराच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे, अशी सुचना हर्षवर्धन पाटील यांनी केली.यावेळी आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी, स्थानक प्रमुख संजय वायदंडे, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमेश ढगे या अधिकाऱ्यांसह प्रा.कृष्णा ताटे , पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी गाळेधारकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.