भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या स्पष्ट सूचना
नवी दिल्ली, 22 मार्च (हिं.स.) : अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी स्थानिक कायद्यांचे पालन करावे अशी सूचना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. अलिकडेच अमेरिकेच्या जॉर्जटाऊन विद्यापीठातील भारतीय विद्यार्थी बदर खान सुरी याला हमासला पाठिंबा दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच वेळी, कोलंबिया विद्यापीठात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थिनी रंजनी श्रीनिवासन यांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, दोन्ही भारतीयांनी मदतीसाठी अमेरिकेतील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला नाही.
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने सोमवारी रात्री वॉशिंग्टन डीसीमधील जॉर्जटाऊन विद्यापीठातील पोस्टडॉक्टरल फेलो बदर खान सुरी यांना ताब्यात घेतले. त्याच्यावर “हमासच्या प्रचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अमेरिकेच्या एका संघीय न्यायाधीशाने सुरीच्या हद्दपारीला तात्पुरते रोखले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की व्हिसा आणि इमिग्रेशन धोरणांवर निर्णय घेणे हा प्रत्येक देशाचा सार्वभौम अधिकार आहे आणि तेथे राहणाऱ्या सर्व लोकांनी या कायद्यांचे पालन केले पाहिजे असे जयस्वल म्हणाले. जेव्हा व्हिसा आणि इमिग्रेशन धोरणाचा विचार केला जातो तेव्हा ते संबंधित देशाच्या धोरणानुसार ठरवले जाते. आम्हाला अपेक्षा आहे की जेव्हा परदेशी नागरिक भारतात येतात तेव्हा ते आमच्या कायद्यांचे पालन करतात. त्याचप्रमाणे, जेव्हा भारतीय नागरिक परदेशात असतात तेव्हा त्यांनी स्थानिक नियम आणि कायद्यांचे पालन करणे अपेक्षित असते.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरीला अमेरिकेतून हद्दपार केले जाईल. बदर खान सुरी यांची पत्नी पॅलेस्टिनी वंशाची आहे. सुरी हे जामिया मिलिया विद्यापीठाचे विद्यार्थी देखील आहेत.
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सुरीचे एका संशयित दहशतवाद्यांशी जवळचे संबंध आहेत जो हमासचा वरिष्ठ सल्लागार आहे. सुरी सक्रियपणे हमासचा प्रचार पसरवतो आणि इंटरनेट मीडियावर यहूदी-विरोधी भावना वाढवतो. या क्रियाकलाप हद्दपार करण्यायोग्य आहेत.———————-
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी