मुंबई, 8 मार्च (हिं.स.)। भूसंपादन प्रक्रियेत अधिक सुलभता आणणार असून प्राधान्याने रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा हिताचा विचार करू अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.
जळगांव जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील दालनात आज बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. भूसंपादनातील अडचणी त्वरीत सोडविण्यात याव्या, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भूसंपादनाचे पूर्ण करू तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल. सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असून त्यांच्या न्याय हक्कासाठी, अधिकारासाठी कटिबद्ध आहे
शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय तसेच प्रत्येकांच्या अडी-अडचणी समजावून घेतल्याशिवाय भूसंपादन प्रक्रिया केली जाणार नाही असेही मंत्री बावनकुळे यावेळी म्हणाले.
*थेट रेल्वे मंत्र्यांना फोन….*
जळगांव जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी रेल्वे मंत्रालयाशी संबंधित असून याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलून संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची विनंती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
*काय आहेत मागण्या…*
* लवाद म्हणून जिल्हाधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर वरिष्ठ अधिकारी अथवा निवृत्त न्यायाधीशांची स्वतंत्र नियुक्ती करावी.
* मुद्रांक शुल्क कायद्यात बदल करून भूसंपादनातील सर्वच प्रकारच्या प्रकरणातील मुद्रांक शुल्क माफ करण्यात यावे
* भूसंपादनाच्या प्रक्रियेतील सर्व प्रकारच्या पोट हिस्सा मोजणी मोफत करण्यात यावी